कसा होतो ‘स्टार्टअप’ स्टार्ट!

0
प्रत्येक स्टार्टअपचा नीट अभ्यास केला, तर एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येईल की, कुणी स्वतःच्या वैयक्तिक अडचणीतून, कुणी सामाजिक गरजेतून किंवा समाजाचे ऋण फेडण्याच्या भावनेतून स्टार्टअपची सुरुवात केलेली दिसते. स्टार्टअपमध्ये ज्या तरूणांनी यश मिळवलंय त्यांच्या प्रयत्नांच्या प्रवासाचा नीट अभ्यास केला, तर त्यातून शिकण्यासारखं खूप आहे, असं लक्षात येईल. या भागात अशाच काही हटके स्टार्टअप्सच्या ‘स्टार्ट’चा मागोवा घेऊया.

संगणक स्वप्नपूर्तीसाठी ‘रिन्यूआयटी’

संगणक, लॅपटॉप आणि मोबाइलशिवाय आज जग चालूच शकत नाही, इथपर्यंत आपला प्रवास झालेला आहे. नवाकोरा संगणक विकत घेऊ न शकणाऱ्या गरजूंना मदत करण्याच्या उद्देशाने २००९मध्ये बंगळुरू इथं ‘रिन्यूआयटी’चा (www.renewit.in) जन्म झाला. ‘रिन्यूआयटी’ जुने संगणक किंवा लॅपटॉप विकत घेते आणि त्याची दुरुस्ती करून शाळा, स्वयंसेवी संस्थांना ते अल्पदरात उपलब्ध करून देते. २०१४च्या अखेरपर्यंत ‘रिन्यूआयटी’चा महसूल तीन कोटींच्या घरात गेला होता. त्यांनी आतापर्यंत जवळपास २० हजारहून अधिक संगणकांची विक्री केली आहे. हा व्यवसाय कितीही केला तरी, त्याला भारतासारख्या देशात पुष्कळ वाव आहे हे निश्चित.

मैदानी खेळांना नवसंजीवनी देणारा ‘गेट अ गेम’
शारीरिक व्यायाम करणं गरजेचं असताना लहान मुलं आणि मोठी माणसं मैदानी खेळांपेक्षा मोबाइलवर गेम खेळण्यात जास्त वेळ रमतात. कबीर मांद्रेकर यांचा ‘गेट अ गेम’ हा स्टार्टअप लोकांना मैदानी खेळांकडे वळवतो. शाळा-कॉलेजांमधील मैदानांचा वापर करायचा आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून खेळण्यासाठी इच्छुक व्यक्तींना एकत्र आणायचं, लहान मुलांना मैदानी खेळांचं प्रशिक्षण द्यायचं, तसंच योगाभ्यास आणि आऊटडोअर जिमच्या माध्यमातून लोकांना फीट राहण्यासाठी पर्याय पुरवायचा, असं हा स्टार्टअप करतो. अक्षरशः शून्य भांडवलातून असे स्टार्टअप उभे राहू शकतात.

शहर सुधारणेचे व्यासपीठ ‘आय चेंज माय सिटी’
आपल्या मुलांना एक जबाबदार नागरिक बनवण्याच्या दृष्टीने पुढाकार घेणाऱ्यांना प्रोत्साहन मिळावं, या भावनेतून रमेश आणि स्वाती रामनाथन यांनी तंत्रज्ञानाचा चपखलपणे वापर करून ‘आय चेंज माय सिटी’ स्टार्टअपची (www.ichangemycity.com) सुरुवात केली. हे एक वेबआधारित सोशल नेटवर्किंग व्यासपीठ आहे. यात सामाजिक प्रश्नांबाबत, तसंच निवडून दिलेल्या स्थानिक जनप्रतिनिधींबाबत पूर्ण माहिती दिलेली असते. तसेच त्यांच्या विविध तक्रारींचे निवारणदेखील केलं जातं. या पोर्टलच्या माध्यमातून आतापर्यंत एक लाख ९१ हजार ८२० तक्रारी नोंदवल्या गेल्या आहेत. त्यापैकी एक लाख ४२ हजार १११ तक्रारींचे निवारण करण्यात आलं आहे.

कचऱ्याचा पुनर्वापर करणारे ʻपॉम पॉमʼ
शहरांतून प्रतिदिन एक लाख ८८ हजार ५०० टन म्हणजेच प्रतिवर्षी ६८.७ दशलक्ष टन घनकचरा तयार होतो. त्यापैकी पुनर्वापर करता येईल, अशा कचऱ्याचा वापर करण्याच्या प्रेरणेतून दीपक सेठी आणि किशोर ठाकूर यांनी ʻपॉम पॉमʼ (www.pompom.in) नावाचा स्टार्टअप सुरू केला. दीपक सांगतात, ‘घनकचऱ्यातून पुनर्वापर करता येण्याजोग्या वस्तू वेगळ्या करण्यासाठी बरेच कष्ट लागत होते. त्यामुळे टनावारी कचरा नुसताच टाकून देण्यात येत होता. हे चित्र बदलायचं तर, पर्यावरणाच्या साखळीची संकल्पना लोकांना समजवून सांगणं गरजेचं होतं. त्यासाठी आम्ही घनकचरा नियोजनाला प्रोत्साहन देण्याचं ठरवलं आणि यातूनच आम्हाला ‘पॉम पॉम’ची कल्पना सुचली.’ एका फोन कॉलवर घरी येऊन पुनर्वापर करता येणाऱ्या वस्तूंचा योग्य दर देणाऱ्या ‘पॉम पॉम’चे मोबाइल अॅप्लिकेशन तसेच संकेतस्थळदेखील आहे. या वस्तू जमा केल्यानंतर कंपनी त्यांची विक्री मोठ्या उद्योगधंद्यांना किंवा कारखान्यांना करते, जिथं त्यांचा पुनर्वापर करण्यात येतो.

पर्यावरणाला अनुकूल 'एनवायरोफिट'
देशातल्या बहुतेक गावांमध्ये आजही कित्येक महिलांना चुलीवर बायोमास म्हणजेच लाकूड आणि गोवऱ्या जाळूनच स्वयंपाक करावा लागतो. याचा केवळ आरोग्यावरच नाही तर, पर्यावरणावरही अनिष्ट परिणाम होत आहे. म्हणून हरीश अंचन यांनी २००७मध्ये ‘एनवायरोफिट’ची (www.envirofit.org) स्थापना केली. ‘एनवायरोफिट’चा ‘मंगला स्टोव्ह’ संपूर्ण स्वदेशी स्टोव्ह आहे. स्टीलचा वापर केल्याने वजनाला हलका आहे. यामध्ये रॉकेट चेंबरच्या तंत्रज्ञानाचा वापर केला गेला आहे, ज्यामुळे उत्सर्जन कमी होतं. कंपनीने आतापर्यंत तब्बल साडे आठ लाख स्टोव्हची विक्री केली. २०१८-१९पर्यंत एक अब्ज स्टोव्हची विक्री करण्याचं कंपनीचं ध्येय आहे.

स्टार्टअप नावाची उमेद ..
खरंतर ‘स्टार्टअप‘ म्हणजे नुसतं पैसे कमावण्यासाठी केलेला साचेबंद व्यवसाय नसून एकूणच आपल्या रोजच्या जगण्यात येणाऱ्या अनंत अडचणींवर तसंच नैसर्गिक साधनांच्या कमतरतेवर माहिती तंत्रज्ञानाच्या मदतीने मात करण्याची एक सकारात्मक धडपड आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. स्टार्टअप खरंतर आजच्या तरुणांची आणि उद्याच्या जगाची मोठी उमेद आहे!
आज जगातील कुठल्याही गोष्टीची संपूर्ण माहिती आपण अक्षरश: एका क्लिकद्वारे मिळवू शकतो आणि एका साध्या मोबाइल फोनवरून जगभरातील लोकांशी संपर्क साधू शकतो. आज जगभर हजारो मुलभूत प्रश्न आहेत आणि प्रत्येक उत्तर हे नवीन प्रश्न निर्माण करत जाणार. याचं कारण, A better World always be under construction! सुरुवातीला अपयश जरी आल तरी, एक गोष्ट निश्चित आहे की, येणाऱ्या प्रत्येक दशकात जागतिक स्तरावर किमान पाच दशकांची प्रगती एकदमच होत जाईल. ही प्रगती आपण घडवायची की, निमूटपणे आपल्या डोळ्यांनी फक्त बघायची, हे आपल्या तरूणांनी ठरवायचं आहे!

This news is co provided by Janpratisadnews


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top