मीराबाईची सुवर्णझळाळी!; विक्रमी वजनासह राष्ट्रकुल स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा सोनेरी यश

0

 


भारताच्या मीराबाई चानूची विश्वातील सर्वोत्तम वेटलिफ्टिंगपटूंमध्ये गणना का केली जाते, याचा शनिवारी पुन्हा एकदा प्रत्यय आला. मीराबाईने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील महिलांच्या वेटलिफ्टिंगमधील ४९ किलो वजनी गटात विक्रमी वजनासह सुवर्णपदकाची कमाई केली. हे तिचे राष्ट्रकुलमधील सलग दुसरे, तर भारताचे यंदाच्या स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक ठरले.


गेल्या वर्षी टोक्यो ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक पटकावणाऱ्या मीराबाईने आपला दबदबा कायम ठेवताना शनिवारी स्नॅचमध्ये ८८ किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये ११३ किलो असे एकूण २०१ किलो वजन उचलत सोनेरी यश संपादन केले. तिने स्नॅच, क्लीन अँड जर्क आणि एकूण वजन या तिन्ही विभागांमधील राष्ट्रकुल स्पर्धेतील सर्वाधिक वजनाचे विक्रम आपल्या नावे केले.मीराबाई आणि रौप्यपदक जिंकणाऱ्या मॉरिशसच्या मारीच्या (१७२) एकूण वजनामध्ये २९ किलोचा फरक होता. यावरूनच मीराबाईचे वर्चस्व सिद्ध झाले. तिने स्नॅचमधील तीनपैकी दोन प्रयत्नांत अनुक्रमे ८४ आणि ८८ किलोचे वजन उचलले. तिचा ९० किलोचा प्रयत्न सदोष ठरला. त्यानंतर क्लीन अँड जर्कमध्ये तिने १०९ आणि ११३ किलोचे वजन यशस्वीपणे उचलले. अखेरीस तिला ११५ किलोचे वजन उचलता आले नाही. मात्र, तिने पहिल्या यशस्वी प्रयत्नासह सुवर्णपदक निश्चित केले होते.


This news is co provided by Janpratisadnews 

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top