जिल्ह्यातील एचआयव्ही संसर्गितांना "नियोजन"चा आधार. पुढील ०४ महिन्यात मिटणार प्रश्न.

0

पुढील 4 महिन्यांचा मिटणार
प्रश्न ...!

- जिल्ह्यातील एचआयव्ही संसर्गितांना "नियोजन" चा आधार
 
- जिल्हा नियोजन समितीकडून डीटीजी औषधांचा पुरवठा

कोल्हापूर : नंदकुमार तेली

कोल्हापूर हा राज्यामध्ये एचआयव्ही संसर्गितांची संख्या जास्त असणाऱ्यांपैकी एक जिल्हा आहे. सद्यस्थितीत साधारणपणे आतापर्यंतच्या 25 हजार रुग्णांच्या नोंदी पैकी सुमारे बारा हजार रुग्ण ए.आर.टी. औषधे घेत आपले आयुष्य सामान्यपणे जगत आहेत. जिल्हा नियोजन समितीकडून डीटीजी औषधांचा पुरवठा करण्यात आला आहे. यामुळे पुढील 4 महिन्यांचा प्रश्न मिटण्यास मदत मिळणार आहे. औषधांचा पुरवठा झाल्याने जिल्ह्यातील एचआयव्ही संसर्गितांना "नियोजन" चा आधार मिळाला आहे.

 - डी.टी.जी. या औषधाचा पुरवठा काही काळासाठी खंडित 

गेल्या चार महिन्यांपासून नाको ( नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेश) मार्फत पुरवण्यात येणाऱ्या डी.टी.जी. या औषधाचा पुरवठा काही काळासाठी खंडित झाल्यामुळे संपूर्ण देशामध्ये तुटवडा भासत होता. 

- मोफत औषध पुरवठा पुरेसा नसल्याचे निदर्शनास

 साधारणतः एक महिन्याच्या औषधाकरता किमान अडीच ते साडेतीन हजार असा खर्च येत होता. त्यामुळे बहुतांशी रुग्ण ही औषधे खरेदी करू शकत नव्हते. यामुळे त्यांच्या आरोग्यास धोका पोहोचण्याची भीती निर्माण झाली होती. त्यामुळे जिल्ह्यातील दानशूर संस्था, व्यक्ती, वैद्यकिय अधिकारी यांच्या मदतीने शक्य तितक्या रुग्णांना मोफत औषध पुरवठा करण्यात आला होता. पण तो पुरेसा पडत नव्हता. तर काही रुग्णांनी केंद्रांमार्फत नाममात्र दरामध्ये विकतही घेतलेली आहेत. ही बाब एड्स नियंत्रण समितीच्या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या निदर्शनास आली. 

- पुढील चार महिन्यांचा मिटणार
 प्रश्न  

जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी राज्य एड्स नियंत्रण संस्थेकडून औषधाची तात्काळ तांत्रिक मान्यता घेण्याच्या सूचना केल्या. याच्या मान्यतेनंतर तातडीने जिल्हा नियोजन समिती मधून दहा लाख रुपयांची तजवीज केवळ या औषधासाठी केली . जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडून जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत रुग्णालयासाठी औषधे खरेदी योजनेतून आवश्यक ती प्रक्रिया वेगाने राबविण्यात आली. यामुळे दीड लाख गोळ्यांची उपलब्धता झालामुळे पुढील चार महिन्यांचा प्रश्न मिटणार आहे. यानंतरचा पुरवठा NACO कडून सुरळीत होईल, अशी आशा आहे.

- औषध पुरवठा झाल्याने केले समाधान व्यक्त

 कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सीपीआर हॉस्पिटल ,सावित्रीबाई फुले हॉस्पिटल, कोल्हापूर, इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय इचलकरंजी, उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लज,लोटस हॉस्पिटल कोल्हापूर या ठिकाणी एआरटी केंद्रे कार्यान्वित आहेत. जिल्ह्याच्या विविध भागातून या केंद्रांना दर महिन्याला औषधे घेण्यासाठी रुग्णांना यावे लागते. ही औषधे या रुग्णांना निरोगी आयुष्यासाठी संजीवनी ठरते. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अशा प्रकारे जिल्हा नियोजन समितीकडून औषध पुरवठा उपलब्ध करून मोठा यक्षप्रश्न टळल्याने रुग्णांचे शारीरिक व आर्थिक नुकसान थांबणार आहे. यामुळे समाधान व्यक्त केले जात आहे.

This news is co provided by Janpratisadnews


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top