आता रात्री १२ वाजेपर्यंत लाऊडस्पीकरला परवानगी, गणपती उत्सवाबाबत शिंदे सरकारचे मोठे निर्णय

0

 


एकनाथ शिंदे यांनी गणेशोत्सवात मंडळांना चार दिवसांऐवजी पाच दिवस लाऊडस्पीकर वापरण्याची परवानगी देण्याची घोषणा केली आहे. साधारणत: गणपती उत्सवात मंडळांना चार दिवस लाऊडस्पीकर वापरण्याची मुभा असते. यात एक दिवस वाढवण्यात आला आहे. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दहीहंडी आदी आगामी सण, उत्सव शांततेत, उत्साहात, धुमधडाक्यात साजरा करावेत, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेश मंडळांना केले. उत्सवात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्यादृष्टीने सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

सार्वजनिक गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दहीहंडी, मोहरम तसेच आगामी सण व उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस आयुक्तालयात कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात आढावा बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, पुणे शहरात सार्वजनिक गणेशोत्सवाला १२५ हून अधिक वर्षांची परंपरा आहे. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव आणि शिवजयंती हे उत्सव समाजजागृतीच्या उद्देशाने सुरू केले. ही परंपरा मंडळांनी सुरू ठेवावी. गेली दोन वर्षे आपण कोरोनाच्या सावटाखाली होतो, त्यामुळे आपले सण उत्साहाने साजरे करता आलेले नाहीत. त्यामुळे यंदा गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दही हंडी आदी सण उत्साहाने, धुमधडाक्यात साजरे व्हावेत यासाठी राज्य शासनामार्फत गणेशोत्सव मंडळांना सहकार्य करण्यात येईल. 

गोविंदा उत्सवही चांगल्याप्रकारे साजरा करावा-

कोविडमध्ये गणेश मंडळांनी सामाजिक जबाबदारीने चांगले काम केले आहे. आगामी गणेशोत्सवातही उत्कृष्ट काम करावे, कोरोनाबाबत चांगली जनजागृती करावी. गोविंदा उत्सवही चांगल्याप्रकारे साजरा करावा, असे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केले.

गणेशोत्सवात ध्वनीमर्यादेला आता पाच दिवसांची सवलत

गणेशोत्सव कालावधीदरम्यान जिल्हाधिकारी यांनी ध्वनीमर्यादेला ४ दिवसांची सवलत दिली होती. गणेश मंडळांच्या मागणीनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यामध्ये एक दिवसाची वाढ करण्याचे आदेश दिले. त्यामुळे शेवटचे पाच दिवस रात्री १२ वाजेपर्यंत लाऊडस्पीकर वाजणार आहेत.

मंडप टाकण्यासाठीचे शुल्क मंडळांकडून घेऊ नये-

राज्य शासनाने गणेश मूर्तींबाबतचे निर्बंध काढून टाकल्याचे यापूर्वीच जाहीर केले आहे. विविध परवानग्याही एक‍ खिडकी पद्धतीने देण्यात याव्यात. मनपाने मंडप टाकण्यासाठीचे शुल्क मंडळांकडून घेऊ नये. वीज मंडळांना तात्पुरते वीजजोड देण्याबाबत प्रशासनाने कार्यवाही करावी असे सांगून परवानग्यांसाठी मंडळांच्या कार्यकर्त्यांना चकरा माराव्या लागू नये याची काळजी घ्यावी असेही निर्देश एकनाथ शिंदे यांनी दिले.

सर्वोच्च उच्च न्यायालयांच्या आदेशांचे पालन होईल याकडे विशेष लक्ष-

गणेशोत्सव तसेच अन्य सण-उत्सव साजरे करताना सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयांच्या आदेशांचे पालन होईल याकडे विशेष लक्ष देऊन उत्सवाला कोणतेही गालबोट लागणार नाही याची काळजी घ्यावी, असेही एकनाथ शिंदे म्हणाले. छोट्या फेरीवाल्यांच्या व्यवसायाबद्दलही प्रशासनाने सकारात्मक रहावे, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.


This news is co-provided by Janpratisadnews

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top