तेरी मेरी यारी…; दोस्तीचं वेड लावायला पुन्हा येतोय ‘दुनियादारी’

0

 

त्याच त्याच प्रेमकथा, सासू-सुनांच्या भांडणांवरचे चित्रपट पाहून कंटाळलेल्या मराठी प्रेक्षकांना पुन्हा थियटरमध्ये खेचायचं काम केलं ते एका खास चित्रपटाने. तो चित्रपट म्हणजे ‘दुनियादारी’. दुनियादारीमुळे मराठी चित्रपट सृष्टीला जणू नवी पालवीचं फुटली. ९० च्या दशकातील सेट, एकमेकांसाठी कोणतंही संकट पेलायला तयार असणारे जिगरी मित्र, तीन हळव्या प्रेम कहाण्या, शिट्टी वाजवायला भाग पडणारे डायलॉग, प्रत्येकाच्या मनात घर करणारी गाणी आणि दोस्ती शिकवणारं ‘एस. पी. कॉलेज’… या सगळ्याचा मिळून तयार झाला तरुणाईसोबतच लहान मोठ्यांनाही वेड लावणारा ‘दुनियादारी’ चित्रपट. या चित्रपटाने फक्त प्रेक्षकांच्या मनावरच नाही तर बॉक्स ऑफिसवरही अधिराज्य गाजवलं. याच चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच भेटीला येणार आहे. दुनियादारीचे दिग्दर्शक संजय जाधव यांनीच चित्रपटाची घोषणा केली आहे.

सध्या जुन्या चित्रपटांचे सिक्वेल बनवण्याचा ट्रेंड चालू आहे. त्याच ट्रेंड मध्ये आता दुनियादारीही सामील होणार आहे. संजय जाधव यांनी एक व्हिडीओ शेयर करत यासंदर्भातील माहिती दिली आहे. संजय जाधव यांनी कॅप्शनमध्ये लिहले आहे कि,”२०१३ साली प्रेक्षकांनी ज्या चित्रपटाला भरपूर प्रेम दिलं! तेरी मेरी यारी …चल करू दुनियादारी म्हणत प्रत्यक्षात ते मैत्रीचे क्षण आमच्या सोबत जगले. ते जग, ती मैत्री, ते प्रेम आणि तीच दुनियादारी आता पुन्हा घेऊन आलोत मैत्रीच्या नव्या ढंगात आणि प्रेमाच्या नवीन रंगात. एका नव्या युगाची, नवीन रंगाची न्यु एज ईस्टमन कलर लव्हस्टोरी. तेरी मेरी यारी … आता पुन्हा दुनियादारी”. संजय जाधव यांनी शेयर केलेल्या व्हिडिओमध्ये दुनियादारीमधील पात्र पाहायला मिळत आहेत. त्यामुळे नव्या भागातही पुन्हा तेच कलाकार नव्या भूमिकांतून पाहायला मिळण्याची शक्यता आहे. प्रत्येकालाच नव्याने प्रेम करायला शिकवणाऱ्या या दुनियादारीने आपल्याला अजरामर अशी पात्र दिली, डायलॉग दिले. त्यामुळेच या दुसऱ्या भागाकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा असणार आहेत, यात शंका नाही. सध्या आलेल्या इतर चित्रपटांच्या सिक्वेलला काही खास प्रतिसाद मिळताना दिसत नाहीये. त्यामुळे पहिल्या भागासारखंच या सिक्वेलला प्रेक्षक पुन्हा डोक्यावर घेणार का हे पाहावं लागेल. या चित्रपटाबद्दल आणखी कोणतीही माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र नेटकरी या चित्रपटासाठी उत्सुक असल्याचं दिसून येत आहे.



Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top