‘प्रति-शिवसेना’ भवन उभारलं तरी श्रद्धा आणि निष्ठेचे स्थान एकच असते; शिवसेनेचा सामानातून हल्लाबोल

0
शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्यातील अस्तित्वाची लढाई आता न्यायालयात जाऊन पोहचली आहे. हा निकाल ज्यांच्या विरोधात लागेल त्यांना पुढे बऱ्याच गोष्टींचा सामना करावा लागेल, हे निश्चितच आहे. पण शिंदे गटाने मात्र स्वतःच अस्तित्व निर्माण करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु केल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळेच मुंबईनंतर आता पुणे, औरंगाबाद आणि ठाण्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे कार्यालय म्हणजेच सेनाभवन उभारण्यात येणार आहे. यावर आता शिवसेना मुखपत्र सामानाच्या अग्रलेखातून टीका करण्यात येत आहे. आता म्हणे हे गटवाले मुंबईत व अनेक ठिकाणी प्रति-शिवसेना भवन उभारणार. त्या प्रति-शिवसेना भवनात शिंदे गटाचे शेणापती जाऊन बसणार. म्हणजे हे लोक आता प्रतिसृष्टी उभी करण्याची भानगड करू लागले आहेत. पुराणात देवादिकांना आव्हान देत कोणी तरी प्रतिसृष्टी निर्माण करण्याची भानगड केली होती. त्या प्रतिसृष्टीचे पुढे काय झाले, याची माहिती दादरच्या सदोबा हगवणकराने घ्यावी. काहींनी प्रतिपंढरी, प्रतिशिर्डी, प्रतिबालाजी वगैरे निर्माण करून तुंबड्या भरल्या, पण श्रद्धेचे व निष्ठेचे स्थान एकच असते. शिवसेनेच्या बाबतीत तर तेच प्रखर सत्य आहे.
तेव्हा या सत्याच्या प्रखर तेजाकडे बघण्याचा प्रयत्न या ‘प्रति-शिवसेना भवन’वाल्यांनी करू नये. पुन्हा आताच तुमच्या गटातील भानगडींना तोंड देताना तुमच्या तोंडाला फेस येत आहे. त्यात प्रति-शिवसेना भवनातील नव्या भानगडींचे निवारण करण्याची नसती आफत सांभाळता सांभाळता तुम्हाला मुश्कील व्हायचे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अस्सल स्वाभिमानी मराठी माणसांचे, हिंदुत्वाचे संघटन शिवसेनेच्या रूपात उभारले. 56 वर्षांनंतरही या संघटनेचा पाया व कळस भक्कम आणि तितकाच अजेय आहे. अनेक लाटा, तडाखे, विश्वासघातकी वावटळींना तोंड देत शिवसेना भवन उभे आहे.

ही इमारत नसून छत्रपती शिवरायांच्या विचारांचा अभेद्य दुर्ग आहे तो! बारा भानगडीतून निर्माण झालेला हा अड्डा नसून ही वास्तू म्हणजे महाराष्ट्राचे अभेद्य कवच आहे, हे गटा-तटाच्या भानगडबाज लोकांनी ध्यानात ठेवावे. शिवसैनिक स्वाभिमानाची मीठ-भाकरी खातो, पण महाराष्ट्राशी बेइमानी करणार नाही. भारतीय जनता पक्षाला मुंबईवरील शिवसेनेचा भगवा उतरवायचा आहे. मराठी माणसाला गुलाम-लाचार करून मुंबई गिळायची आहे व त्याकामी शिंदे गटाची भानगड त्यांनी निर्माण केली. ही बाब गंभीर आहे. शिंदे गटाच्या भानगडीस संजय शिरसाट यांनी तोंड फोडले.

‘ह्योच नवरा पायजे’च्या तालावर ते म्हणाले, ‘‘मंत्रीपद आता हवेच.’’ पन्नास जणांना हवे म्हणजे हवेच. चला, या निमित्ताने एक जळजळीत सत्य बाहेर आले. शिंदे गटाने शिवसेना सोडताना स्वाभिमान, हिंदुत्व वगैरेंचा जो मुद्दा समोर आणला तो सपशेल झूठ आहे. जे पन्नास जण शिंदे गटात गेले त्यांना मंत्रीपदे व काही ना काही हवे म्हणून गेले. हिंदुत्वाशी त्यांचा संबंध नाही. ज्यांना मंत्रीपदे वगैरे मिळणार नाहीत त्यांना प्रति-शिवसेना भवनातून प्रति-मंत्रीपदे देता येतील काय? प्रति-राज्यपाल एखाद्या प्रति-राजभवनात या भानगडबाज गटाचा प्रति-शपथविधी करू शकतील काय?

This news is co-provided by Janpratisadnews


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top