पीव्ही सिंधूच्या नेतृत्वातील बॅडमिंटन संघाने जिंकले ‘सिल्वर मेडल'

0

 


पीव्ही सिंधूच्या नेतृत्वाखालील भारताचा बॅडमिंटन संघ राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्यापासून वंचित राहिला. मात्र संघाने देशासाठी रौप्य पदक प्राप्त केले. या खेळांच्या मिश्र सांघिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत (commonwealth games 2022) भारतीय संघ मलेशियाकडून १-३ ने पराभूत झाला. भारताचे हे राष्ट्रकुल स्पर्धेतील एकूण १३ वे पदक ठरले आहे. यापूर्वी ५ सुवर्ण, ४ रौप्य आणि ३ कांस्य पदके भारताने जिंकली आहेत. याआधी मंगळवारी लॉन बॉल्स महिला संघ आणि टेबल टेनिस संघाने सुवर्णपदक पटकावले होते. भारत पदकांच्या गुणतालिकेत सहाव्या क्रमांकावर कायम आहे.

सुवर्णपदकाच्या लढतीत भारताची सुरुवात चांगली झाली नाही. पुरुष दुहेरीच्या सामन्यात सात्विक साईराज रँकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीचा सरळ गेममध्ये पराभव झाला. टेंग चिया आणि वोई सोह या मलेशियाच्या जोडीने हा सामना २१-१८, २१-१५ असा जिंकला. अशाप्रकारे मलेशियाने १-० अशी आघाडी घेतली. पण त्यानंतर पीव्ही सिंधूने महिला एकेरीची लढत जिंकून सामना १-१ असा बरोबरीत आणला. सिंधूने जिन गोहचा २२-२०, २१-१७ असा संघर्षपूर्ण लढतीत पराभव केला. किदाम्बी श्रीकांतला पुरुष एकेरीच्या सामन्यात चांगली सुरुवात करता आली नाही. टाय यंगविरुद्ध त्याने पहिला गेम १९-२१ असा गमावला. मात्र, दुसऱ्या गेममध्ये त्याने पुनरागमन करत २१-६ असा आरामात विजय मिळवला. पण तिसऱ्या गेममध्ये सुरुवातीपासूनच दोघांमध्ये चांगलीच झुंज पाहायला मिळाली. सुरुवातीला ५-५ अशी बरोबरी होती. यानंतर मलेशियाच्या खेळाडूने १९-१६ अशी आघाडी घेतली. अखेरीस, त्याने २१-१६ असा गेम जिंकून मलेशियाला २-१ अशी महत्त्वपूर्ण आघाडी मिळवून दिली. यानंतर महिला दुहेरीच्या लढतीत ट्रीजा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीचा ०-२ असा पराभव झाला आणि मलेशियाने सुवर्णपदक पटकावले. त्यामुळे भारताला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.


This news is co-provided by Janpratisadnews


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top