पुण्याला जाण्यापूर्वी राज ठाकरेंचा मनसेच्या नेत्यांना सज्जड इशारा, 'एकमेकांची उणीदुणी काढलीत तर....'

0
यापुढील काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत कोणीही अंतर्गत वादातून एकमेकांविरुद्ध टीका केल्यास मी त्या नेत्यांना पक्षात ठेवणार नाही, असा इशारा राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिला. गेल्या काही महिन्यांमध्ये मनसेच्या (MNS) पुण्यातील नेत्यांमध्ये प्रचंड अंतर्गत संघर्ष सुरु असल्याचे दिसून आले होते. पुण्यात वसंत मोरे (Vasant More) विरुद्ध मनसेचे इतर पदाधिकारी अशी लढाई सुरु झाली होती. राज ठाकरे (Raj Thackeray) हे बुधवारी पुणे दौऱ्यावर जाणार आहेत. यापूर्वी राज ठाकरे यांनी आपल्या भाषणातून पुण्यातील सर्व नेत्यांचे कान टोचले. ते रवींद्र नाट्यमंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) मेळाव्यात बोलत होते.
यावेळी राज ठाकरे यांनी पुण्यातील मनसेच्या नेत्यांना फैलावर घेतले. सोशल मीडियाचा वापर जरुर करावा. पण सोशल मीडियावर पक्षातील पक्षात कोणी एकमेकांवर कॉमेंट केल्या तर त्याला मी एक क्षणही पक्षात ठेवणार नाही. आजपर्यंत मी तुमचे खूप चोचले पुरवले. आतापर्यंत झालं ते खूप झालं. तुम्हाला सोशल मीडियावर तुमच्या कामाबद्दल काही सांगायचे असेल तर सांगा. पण तुम्हाला एकमेकांची उणीदुणी काढायची असतील तर ती काढून बघाच. असे प्रकार कुठे सुरु असतील तर ते माझ्यापर्यंत पोहोचवा, असेही राज ठाकरे यांनी मनसैनिकांना सांगितले.
राज ठाकरे यांची फटकेबाजी
राज ठाकरे यांनी मंगळवारी रवींद्र नाट्यमंदिर येथील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ठाकरी शैलीत भाषण ठोकले. राज ठाकरे यांनी भाषणाच्या सुरुवातीला त्यांच्या शस्त्रक्रियेचे काही किस्से सांगितले. आपला ट्रेडमार्क सेन्स ऑफ ह्युमर वापरून राज ठाकरे यांनी हे किस्से नेहमीप्रमाणे रंगवून सांगितले. हे सगळे किस्से ऐकताना सभागृहात चांगलाच हशा पिकला होता.
राज ठाकरे यांनी त्यांच्या हिपबोन शस्त्रक्रियेचा एक किस्सा सांगितला. माझ्यावर हिप बोन शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला तेव्हा सगळेजण मला प्रश्न विचारत होते. मी एकाला सांगितलं की, माझी हिप (मांडी) रिप्लेसमेंट होणार आहे. त्यावर एकाने विचारले की, हिप रिप्लेसमेंट का करावी लागत आहे? तेव्हा मी म्हटलं की, इतकी वर्षे जवळच्यांनी आणि बाहेरच्यांनी माझी लावली आहे ना.... राज ठाकरे यांच्या या वक्तव्यावर सभागृहाच एकच हशा पिकला.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top