दगडी चाळ २ - संपूर्ण कुटुंबासह हा चित्रपट पाहता येईल

0
खऱ्याखुऱ्या आयुष्यातील काही गोष्टी अशा असतात की ज्या खऱ्या आहेत की खोट्या याविषयी उघडपणे काही सांगता येत नाही. त्यांच्याभोवती गूढतेचं वलय कायम असतं. बाहेरून त्याकडे पाहणाऱ्यांना त्याविषयी कायम कुतूहल असतं. मग तो कुणी राजकीय नेता असू दे किंवा म्हटला जाणारा 'डॉन'. त्यावरच बेतलेली एक कथा म्हणजे 'दगडी चाळ २'. आपण सादर करत असलेली कथा ही 'काल्पनिक' आहे, असं चित्रपटाच्या प्रारंभीच दिग्दर्शक स्पष्ट करतो; पण या कथेच्या केंद्रस्थानी असलेलं 'डॅडी' हे पात्र खऱ्याखुऱ्या आयुष्यातून उचललं असल्याने; या कथेची तुलना प्रेक्षक सत्य घटनांशी केल्यावाचून राहत नाहीत. यापूर्वीदेखील असंच काहीसं 'दगडी चाळ' चित्रपटात लेखक-दिग्दर्शकाने केलं होतं. त्याच गोष्टीच्या पुस्तकाची पुढील पानं आता 'दगडी चाळ २'मध्ये उलगडली आहेत.

मुंबईतील प्रसिद्ध दगडी चाळ आणि तेथे राहणारे 'डॅडी' पुन्हा त्याच आपल्या वलयासह दिग्दर्शकाने आणि पडद्यावर अभिनेते मकरंद देशपांडे यांनी साकारले आहेत. जो सिनेमाचा एक महत्त्वाचा 'यूएसपी' आहे. दुसरीकडे या सिनेमाचा नायक असलेला सूर्या (अंकुश चौधरी) आणि त्याची पत्नी सोनल (पूजा सावंत) त्यांच्या आयुष्यात होणारी उलथापालथ लेखक-दिग्दर्शकानं रंजकतेनं पडद्यावर रेखाटलीय. दिग्दर्शक म्हणून चंद्रकांत कणसे यांचा हा तिसरा सिनेमा आहे. यापूर्वी 'दगडी चाळ' आणि 'भेटलीस तू पुन्हा' या सिनेमात त्यानं आपली कल्पक दृष्टी दाखवली होती. या तिसऱ्या सिनेमात ती दोन पावलं पुढे गेली आहे; पण ती अधिक उंचवायला हवी होती, असं वाटत राहतं.'दगडी चाळ २'च्या गोष्टीची सुरुवात अतिशय संथ होते. मूळ कथानकासाठी पूरक पार्श्वभूमी रचण्यात पटकथाकार आणि कथा लेखकाने सिनेमाच्या पूर्वार्धाला काहीशी लांबण लावली आहे. ज्यांनी पहिला सिनेमा पाहिला आहे; त्यांच्यासाठी हे अधिक कंटाळवाणे ठरू शकते. नंतर हळुवारपणे सिनेमा आपला अपेक्षित वेग पकडतो आणि रंजकतेनं उलगडणारी ही गोष्ट कथानकाच्या मध्यापासून उत्तरार्धात प्रेक्षकांना खुर्चीवर खिळवून ठेवते. सिनेमाची पार्श्वभूमी मुंबईतील गँगवॉर आणि राजकारण ही आहे. परिणामी यात गुंडगिरी, हिंसाचार आहेच. तरीही प्रेक्षकाला संपूर्ण कुटुंबासह हा चित्रपट पाहता येईल, याची काळजी दिग्दर्शकानं घेतली आहे. मात्र, कदाचित याच कारणामुळे सिनेमाची मांडणी 'वास्तववादी' ठरत नाही, जी सिनेमाची 'कमकुवत' बाजूही ठरली आहे. कथानकाबद्दल सांगायचं झालं तर सूर्या आणि सोनल आपल्या लहान मुलासह मुंबई आणि दगडी चाळ सोडून आता अलिबागला राहायला आले आहेत. सूर्या आता सोनलच्या सांगण्यावरून गुंडगिरीच्या विळख्यातून बाहेर पडला आहे; पण अडलेल्यांना मदत करण्याची सूर्याची वृत्ती आजही कायम आहे. दुसरीकडे मुंबईत दगडी चाळ आणि तेथे असलेले 'डॅडी' आता राजकारणी झाले आहेत. राजकारणातील वैरामुळे 'डॅडीं'ना अडकवण्याचा किंबहुना मारण्याचा प्रयत्न त्यांचे राजकीय शत्रू करत आहेत. या सगळ्या गडबडीत 'डॅडीं'च्या दोन महत्त्वाच्या माणसांचा खून होतो. आता 'डॅडीं'वरदेखील वार होणार म्हटल्यावर मदतीसाठी सूर्याला बोलावणं धाडलं जातं; पण चाळीपासून दूर गेलेला सूर्या पुन्हा चाळीत येण्यास नकार देतो. इकडूनच कथानक रंजक वळण घेते. पुढे सूर्या खरंच मुंबईत येतो का? का येतो? तो नेमका कोणाला मारण्यासाठी येतो? हे सगळं जाणून घेण्यासाठी तुम्ही चित्रपट पाहायला हवा. सिनेमाचा उत्तरार्ध आणि त्याची पटकथा चोख बांधली गेलली आहे. कथानकातील 'ट्विस्ट' भुवया उंचावणाऱ्या आहेत. सिनेमा पाहताना प्रेक्षकांना वेळीच पुढील संभाव्य घटनेचा वेध घेता येतो. त्यामुळे प्रेक्षक (केवळ उत्तरार्धात) रंजकतेनं चित्रपटात गुंततो.

मकरंद देशपांडे यांनी पुन्हा एकदा उत्कृष्टपणे पडद्यावर 'डॅडीं'ची व्यक्तिरेखा साकारली आहे. व्यक्तिरेखेची देहबोली, संवादफेक, नजर, अभिनिवेश अगदी चोख आहे. सिंह स्वतःच हद्दीत ज्याप्रमाणे राजा असतो; तसंच स्वतःभोवतीचं वलय मकरंद देशपांडे यांनी प्रभावीपणे पडद्यावर साकारलं आहे. परिणामी जेव्हा जेव्हा मकरंद अर्थात डॅडी पडद्यावर येतात, तेव्हा टाळ्या-शिट्ट्या वाजल्याशिवाय राहत नाही. दुसरीकडे अंकुश चौधरीनं संयमी आणि तितक्याच डॅशिंग अशी सूर्याची व्यक्तिरेखा तडफेनं उभी केली आहे. अभिनेत्री पूजा सावंतच्या अभिनयातील सहजता विशेष भावते. नजीकच्या काळातील सिनेमांमध्ये पूजानं तिच्या अभिनयाची उंची दाखवून दिली होती. 'दगडी चाळ २'मध्ये त्यात तिनं सातत्य कायम राखलं आहे. सिनेमॅटोग्राफरनं काही महत्त्वाची दृश्यं कुशलतेनं टिपली आहेत. काही दृश्य कल्पकतेनं 'वन शॉट' चित्रित करण्यात आली आहेत. संवाद, पार्श्वसंगीत उत्तम. 'धागा-धागा' गाण्याचं नवं रुप वळल्यास इतर सर्व गाणी सुमार झाली आहेत. एकंदर या दगडी चाळीत एकदा फेरफटका मारायला हरकत नाही.

This news is co-provided by Janpratisadnews



Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top