नदीपात्रात मूर्ती विसर्जनास मनाई; गणेशोत्सवासाठी नाशिक महानगरपालिकेच्या महत्त्वाच्या सूचना

0


विसर्जनासाठी कृत्रिम तलाव आणि पारंपरिक विसर्जनस्थळांची यादी जाहीर केली जाणार असून, त्या ठिकाणी प्रतीकात्मक विसर्जन करून गोदावरीचे प्रदूषण रोखण्यासह पर्यावरणाचे संरक्षण करण्याचे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले आहे. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. पुलकुंडवार यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत महापलिका मुख्यालयात अधिकाऱ्यांनी बैठक पार पडली. त्यात विविध निर्णय घेण्यात आले. 'पीओपी'पासून तयार केलेल्या गणेशमूर्ती पाण्यात विरघळत नाहीत. मूर्तींवरील रंगद्रव्ये विषारी असल्यामुळे मूर्ती नदीपात्रात बुडविल्याने मोठ्या प्रमाणावर जलप्रदूषण होते. त्यामुळे जलचरांच्या जीवांना धोका निर्माण होतो. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात गणेशमूर्तींच्या नदीपात्रात थेट विसर्जनास प्रतिबंध केला जाणार आहे. या बैठकीस शहर अभियंता शिवकुमार वंजारी, घनकचरा विभागाचे संचालक डॉ. आवेश पलोड, महापालिकेचे सर्व विभागीय अधिकारी, तसेच घनकचरा व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. 
दीड दिवसाच्या बाप्पांपासून नियोजन
गणेशमूर्ती विसर्जनाकरिता महापालिकेच्या माध्यमातून सालाबादाप्रमाणे कृत्रिम तलाव आणि पारंपरिक विसर्जनस्थळांची यादी जाहीर केली जाईल. या ठिकाणी गणेशभक्तांनी प्रतीकात्मक विसर्जन करून मूर्ती महापालिकेच्या मूर्ती संकलन केंद्रांमध्ये दान करण्याचे आवाहन केले जाणार आहे. त्यासाठी पोलिस प्रशासनाचीदेखील मदत घेतली जाणार असून, बंदोबस्तासाठी पोलिस आयुक्तांना पत्र सादर केले जाणार आहे. याशिवाय मूर्ती संकलन केंद्रांकरिता सामाजिक, स्वयंसेवी संस्थांचीदेखील मदत घेतली जाणार आहे. दीड, तीन, पाच व सात दिवसांच्या मूर्तींचे संकलन, मूर्ती संकलन करताना येणाऱ्या अडचणी आणि त्यावरील उपाययोजनांबाबतही या बैठकीत चर्चा झाली.
बैठकीतील ठळक निर्णय...
-शहरात ५२ ठिकाणी कृत्रिम तलाव, पारंपरिक विर्सजन स्थळे
-मूर्ती संकलनासाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घेणार
-निर्माल्य संकलनासाठी विभागनिहाय स्वतंत्र घंटागाडी
-मूर्ती संकलन केंद्रांवर सेल्फी पॉइंट उभारणार
-विर्सजनस्थळी पोलिसांबरोबर पालिकेचे सुरक्षारक्षक नेमणार
-विसर्जन मिरवणूक मार्ग स्वच्छ, अतिक्रमणमुक्त करणार
-विसर्जनस्थळी वैद्यकीय सुविधा, रुग्णवाहिकेची व्यवस्था

This news is co-provided by Janpratisadnews


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top