वाढत्या ‘सीएनजी’ दरामुळे रिक्षा भाडेवाढ मागणी पुढे येणारच – जितेंद्र आव्हाड

0

 


“वर्षभरामध्ये सीएनजीचा दर ३६ रुपयांनी वाढला असून त्यात आणखी ६ रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे रिक्षाचे भाडे वाढवायची मागणी पुढे येणार आणि सगळे जण रिक्षा वाल्यांना शिव्या घालणार, हे विसरुन की तेही आपल्यासारखे आहेत.”, असे मत व्यक्त करत राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी रिक्षा भाडेवाढीचे समर्थन केले आहे. सध्याच्या महागाईचा विचार करता रिक्षा चालक आपला संसार कसा चालवत असतील याचा आपण सगळ्यांनीच विचार करायला हवा, असेही त्यांनी म्हटले आहे. “वर्षभरामध्ये सीएनजीचा दर ३६ रुपयांनी वाढला आहे. कालच रात्री सीएनजीच्या दरामध्ये ६ रुपयांनी वाढ झाली असल्याची बातमी आली. प्राप्त परिस्थितीमध्ये मी हे लिहीत असताना कदाचित रिक्षामध्ये बसणारे थोडेसे अस्वस्थ होतील. पण, संसार तर सगळ्यांनाच चालवायचा असतो. रिक्षामध्ये होणारा सीएनजीचा वापर आणि रिक्षाला प्रति किलोमीटर किती सीएनजी लागतो. याचे गणित मांडले तर कमाईतील ५० टक्के हे सीएनजीवर खर्च होतात. साधारण १२ तासामध्ये एखाद्या रिक्षावाल्याने एक हजार रुपये कमावले. तर त्यामधील कमीत-कमी ४०० रुपये हे त्याला सीएनजी पोटी खर्च करावे लागतात. जेव्हा सीएनजी चे दर कमी होते, तेव्हा सीएनजी वरची रिक्षा परवडत होती आणि त्याचा फायदा देखील होता.”, असेही आव्हाड यांनी म्हटले आहे.

म्हणजे रिक्षावाला कमावणार काय? खाणार काय –

याचबरोबर “रिक्षा चालवणारे अर्धेअधिक चालक हे रिक्षाचे मालक नसतात. तर त्यांनी दिवसभर झालेल्या व्यवसायाचे काही टक्के हे मालकाला द्यावे लागतात. अशा आर्थिक करारावरती रिक्षा चालवली जाते. कुठल्याही झोपडपट्टीमध्ये भाडेतत्वावर घर घेण्याचे ठरवले तर कमीत-कमी ४ ते ५ हजार रुपये इतके भाडे भरावे लागते. संपूर्ण संसाराचा खर्च विचारात घेतला तर ते अधिक पाच हजार रुपये होतात. म्हणजे रिक्षावाला कमावणार काय ? खाणार काय ? आणि मेहनत करणार काय?” , असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

समाजाने जरुर विचार करावा –

“ठाणे तसेच मुंबईमध्ये जवळ-जवळ लाखोने रिक्षा चालक-मालक आहेत. सध्याच्या महागाईचा विचार करता रिक्षा चालक आपला संसार कसा चालवत असतील याचा आपण सगळ्यांनीच विचार करायला हवा. कारण, रिक्षा ही आता वाहतुकीचे प्रमुख साधन आहे. एकेकाळी राज्य किंवा महापालिका यांची वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोसळलेली असतांना सामान्य माणसाला रिक्षाशिवाय पर्याय राहिलेला नाही. अशा अवस्थेमध्ये रिक्षा चालक- मालकांसमोर आलेली अडचण याबाबत समाजाने जरुर विचार करावा.”,असे आवाहनही त्यांनी केले आहे.

आपण एवढे आत्मकेंद्रीत झालो तर पुढे कसे होईल –

“हे सरकार शेती मालामध्ये देखील भाव वाढवायला तयार नाही. पण, त्याच्यावरती जीएसटी लावायला तयार झाली आहे. फिक्स प्राईस वरती त्यांचा विश्वास नाही म्हणजे विकत घेणाऱ्याला सर्वच फायदे मिळाले पाहीजेत, हा केंद्र सरकारचा विचार आहे. पण, यामधून शेतकरी असो नाहीतर रिक्षाचालक यांचे संसार कसे चालतील याचा कुठलाही विचार समाजातील एकही घटक करताना दिसत नाही. आपण एवढे आत्मकेंद्रीत झालो तर पुढे कसे होईल. याचा आपण सगळ्यांनीच विचार करायला हवा,” असेही आव्हाड यांनी म्हटले आहे.


This news is co-provided by Janpratisadnews


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top