अखेर शिंदे सरकारचं खाते वाटप जाहीर; वाचा कोणत्या मंत्र्यांकडे कोणते पद

0

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जम्बो कॅबिनेटचा तब्बल ३८ दिवसांनंतर मंत्रिमंडळ विस्तार झाला. मात्र खातेवाटप अजूनही झाले नव्हते. त्यावरून विरोधकही शिंदे-फडणवीस सरकारवर सातत्याने निशाणा साधत होते. यातच आता राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खाते वाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. विशेष म्हणजे या खाते वाटपात भाजपचे वर्चस्व दिसून येत आहे. तर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप आता जाहीर करण्यात आले आहे.

खातेवाटपाच्या यादीनुसार मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ तसेच इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेली खाती आहेत. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असणार आहेत. 

कॅबिनेट मंत्र्यांचे खातेवाटप

राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास, सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय, चंद्रकांत पाटील यांच्याकडे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य, डॉ. विजयकुमार गावित यांच्याकडे आदिवासी विकास, गिरीष महाजन यांच्याकडे ग्राम विकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण, गुलाबराव पाटील यांच्याकडे पाणीपुरवठा व स्वच्छता तर दादा भुसे यांच्याकडे बंदरे व खनिकर्म ही खाती देण्यात आली आहेत. संजय राठोड यांच्याकडे अन्न व औषध प्रशासन, सुरेश खाडे यांच्याकडे कामगार, संदीपान भुमरे यांच्याकडे रोजगार हमी योजना व फलोत्पादन, उदय सामंत यांच्याकडे उद्योग, तानाजी सावंत यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, रवींद्र चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अब्दुल सत्तार यांच्याकडे कृषी, दीपक केसरकर यांच्याकडे शालेय शिक्षण व मराठी भाषा, अतुल सावे यांच्याकडे सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण, शंभूराज देसाई यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क तर मंगलप्रभात लोढा यांच्याकडे पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता, महिला व बालविकास खाते, अशाप्रकारे हे पहिल्या टप्प्यातील खाते वाटप करण्यात आले आहे.

This news is co-provided by Janpratisadnews



Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top