उद्धव ठाकरेंचं दसरा मेळाव्याबाबत मोठं विधान, पदाधिकाऱ्यांशी बोलताना म्हणाले..

0

शिवसेनेकडून दसरा मेळाव्यासाठी आधी परवानगी पत्र दाखल करण्यात आलं असून शिंदे गटानं त्यानंतर शिवाजी पार्कवर मेळावा करण्यासाठी परवानगी अर्ज दाखल केला आहे. अद्याप यावर कोणताही निर्णय झालेला नाही. मात्र, शिवसेनेला परवानगी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटानं बीकेसीमध्ये दसरा मेळावा घेण्याची तयारी ठेवल्याचंही सांगितलं जात आहे. आता यावर खुद्द उद्धव ठाकरे यांनीच प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

यंदा शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घ्यायचाच आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. “दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घ्यायचाच आहे. तेव्हा मला जे बोलायचंय ते बोलेनच. पण आता एक बरंय, की आत्तापर्यंत मला बोलताना तोंडावर मुख्यमंत्रीपदाचा मास्क असायचा. त्यामुळे जरा जपूनच बोलावं लागायचं. आता त्यावेळी जे सुचेल, जे बोलायचंय ते मी बोलेन”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“मला कसलीच चिंता नाही. जे काही आहे, ते माझं नाहीये. माझी काही खासगी मालमत्ता नाहीये. मुख्यमंत्रीपद जर मला पाहिजे असतं, तर मी एका क्षणात ते सोडू शकलो नसतो. आपल्याकडे ३०-४० आमदार तेव्हा होतेच. मला मुख्यमंत्रीपदावर चिकटून राहायचं असतं. तर मी त्यांनाही डांबून ठेवू शकलो असतो”, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

“ती बाई सिगरेट पिऊन…”, चंद्रकांत खैरेंची नवनीत राणांवर टीका; उद्धव ठाकरेंचा केला होता एकेरी उल्लेख! “माझीही ओळख होतीच ना ममता बॅनर्जींशी. मी घेऊन गेलो असतो सगळ्यांना कलकत्त्याला. तिकडे कालीमातेच्या मंदिरात नेलं असतं. राजस्थानला कुठेतरी नेलं असतं. पण तो माझा स्वभाव नाही. राहायचं असेल तर निष्ठेनं राहायचं. मनात शंका-कुशंका घेऊन राहाणं याला राहाणं म्हणत नाही. मी सगळ्यांना सांगितलं दरवाजा उघडा आहे. राहायचं त्यांनी निष्ठेनं राहा”, असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

गेल्या काही दिवसांपासून दसरा मेळाव्यावरून जोरदार चर्चा सुरू झाली आहे. दसरा मेळावा नेमका कुणाचा? यावरून दावे-प्रतिदावे सुरू आहेत. एकीकडे शिंदे गटाकडून बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचारांचा दाखला देत दसरा मेळावा शिंदे गटाचाच होईल, असं सांगितलं जात असताना दुसरीकडे शिवसेनेकडून इतिहासाचा दाखला देत आजपर्यंत शिवसेनेचाच दसरा मेळावा होत आला आहे, असा दावा केला जात आहे. या सर्व घडामोडींवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मात्र अद्याप काही बोलले नव्हते. आता मात्र उद्धव ठाकरेंनी याबाबत मातोश्रीवर शिवसेना पदाधिकाऱ्यांशी चर्चा करताना आपली भूमिका मांडली आहे.

दसरा मेळावा नेमका कुणाचा?

आम्हीच खरी शिवसेना असा दावा करण्यासोबतच शिंदे गटानं शिवसेनेचं निवडणूक चिन्ह असलेल्या धनुष्यबाणावर देखील दावा सांगितला आहे. हा वाद सर्वोच्च न्यायालयात असताना काही दिवसांवर येऊन ठेपलेला दसरा मेळावा शिंदे गटाचाच होणार, असं सांगायला शिंदे गटातील नेतेमंडळींनी सुरुवात केली आहे. त्यापाठोपाठ भाजपामधूनही शिंदे गटाचाच दसरा मेळावा व्हायला हवा, असा दावा केला जात आहे. पोलिसांनी मात्र अद्याप दोन्ही अर्जांवर निर्णय दिलेला नाही.
Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top