प्राचीन काळापासून अस्तित्वात असलेले श्रीक्षेत्र गरुडेश्वर यांचे स्थान महात्म्य

0


 जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क

 ( अनिल जोशी )


 प्राचीन काळापासून श्रीक्षेत्र गरुडेश्वर हे आध्यात्मिक क्षेत्रातील एक सुंदर रमणीय तपोभूमी आहे. याच स्थळी पूर्वीच्या काळी एक बलशाली असा गजासुर नावाचा राक्षस राहत होता. त्याने हत्तीचे रूप घेऊन गरुडाशी भीषण युद्ध केले. त्यात गरुडाने, गजासुराचा वध केला व त्याची हाडे या पर्वतावर पडून राहिली ,तसेच कालांतराने ही हाडे नर्मदा नदीत वाहून आल्याने, त्याचा देह पवित्र झाला .गजा सुराने नर्मदा नदीच्या किनारी राहून शंंभर वर्षे तपश्चर्या करून, भगवान शिव शंकरांना प्रसन्न करून घेतले. भगवान शंकराने , गजासुरास वर मागायला सांगितले ,त्या वेळेला गजासुराने असा वर मागितला की जे कोणी या नर्मदा किनारी स्नान, संध्या, देवपूजा, तर्पण व दान करतील त्यांची जन्मोजन्मीची सर्व पापे नष्ट व्हावीत. शिवाय अमावस्या, संक्रांत विशेष पर्व, ग्रहण आणि अधिक महिन्यात रविवारी, सोमवारी जे भक्त या नर्मदा नदीत स्नान करतील ,त्यांना अन्य क्षेत्रांच्या मानाने लाख पटीने फळ मिळावे आणि फक्त नर्मदा नदीत स्नानाने सर्व प्राणीमात्रांच्या पापाचे परिमार्जन व्हावे व हे स्थळ कुरुक्षेत्राप्रमाणे प्रसिद्ध व्हावे असा वर मागितला. भगवान शंकराने तथास्तु म्हणून सदर वरास अभिवचन दिले. त्याचबरोबर गजासुराने," माझ्या शरीराचे कातडे आपण धारण करून ज्या गरुडाच्या हातून माझा मृत्यू झाला त्या गरुडा बरोबर माझे नाव जोडून या ठिकाणी आपण वास करावा व भक्तांच्या मनोकामना पूर्ण कराव्यात." असाही वर मागून भगवान शंकरास प्रसन्न करून घेतले .गजासुराची प्रार्थना ऐकून भगवान शंकराने असे सांगितले की तुझे नाव त्रिभुवनात प्रसिद्ध होण्यासाठी ,मी तुझ्या शरीराचे कातडे घालून या स्थानी राहून, भक्तांची मनोकामना पूर्ण करीन, फक्त त्यासाठी तू गरुड नावाच्या लिंगाची या क्षेत्री स्थापना कर ,म्हणजे या क्षेत्रास गरुडेश्वर महादेव या नावाने ओळखले जाईल. तसेच तुझ्या गजदेहाची कवटी नर्मदेच्या पाण्यात पडली त्यामुळे तुझ्या देहास दिव्यत्व प्राप्त होऊन लाभ मिळाला, म्हणून नर्मदा किनारी लिंगाची स्थापना कर की जे लिंग करोटेश्वर महादेव या नावाने प्रसिद्ध होईल .भगवान शंकराच्या आज्ञेप्रमाणे गजा सुराने एक लिंग पर्वतावर तर दुसरे लिंग नर्मदा किनारी स्थापन केले. जे भक्त भाविक या दोन्ही लिंगाचे पूजन शुक्लपक्ष व कृष्णपक्षाची अष्टमी, चतुर्दशीच्या दिवशी भक्ती भावाने पूजन करून जागरण करतील, त्यांच्या २१पिढ्यांचा उद्धार होईल व नर्मदेच्या पाण्यामध्ये उभे राहून जे पितृ तर्पण करतील ,त्यांच्या पूर्वजांना मी कैलासात घेऊन जाईन असे अभिवचन भगवान शंकराने दिले .जे भक्त भाविक येथे येऊन संपूर्णपणे निष्काम सेवा करतील, त्यांना या जन्मी सर्व पापातून मुक्ती मिळेल .त्या दिवसापासून नर्मदेच्या उत्तर किनारी गरुडेश्वर नावाचे क्षेत्र निर्माण झाले. याच ठिकाणी प्राचीन काळी नारदांनी मोठी तपश्चर्या करून, हरिहराला प्रसन्न करून घेतले व एक लिंग स्थापन केले की जे लिंग आज नारदेश्वर महादेव म्हणून प्रसिद्ध आहे. याच श्रीक्षेत्र गरुडेश्वर येथे दत्त उपासक व दत्तात्रयांवर संस्कृत व मराठीमध्ये विपुल लेखन, संपदा करणारे, आचरणनिष्ठ दंडी संन्यासी परमपूज्य परिभाजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती यांनी देखील शके १८३५ चैत्र वैद्य षष्ठी शनिवारी येथे येऊन या महान प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेल्या एकांत क्षेत्रात तपश्चर्या केली. या ठिकाणी स्वामींचे भक्त त्याकाळी बरेच येत असत .परमपूज्य वासुदेवानंद सरस्वतींनी या ठिकाणी बडोद्याच्या विठ्ठल सोनी यांनी आणलेली दत्तमूर्ती आश्विन शुद्ध नवमी या दिवशी प्रतिष्ठापना करून एक सुंदर दत्त मंदिर बांधले .आजही या दत्तप्रभूंच्या मूर्तीची पूजा अर्चा त्या दत्त मंदिरात होते. या दत्त मंदिरात मध्यभागी दत्तप्रभूंची मूर्ती व उजवीकडे आद्य शंकराचार्य व डावीकडे सरस्वती मातेची मूर्ती आहेत. या तिन्ही मूर्ती संगमरवरी आहेत. शेवटी याच एकांत नर्मदा किनारी असलेल्या गरुडेश्वर ठिकाणी, परमपूज्य परिवाचरकाचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामीजींनी सन १९१४ साली समाधि घेतली. दत्तक्षेत्रातील भक्त आणि भाविक या लोकातील जन्ममुक्तीसाठी नर्मदा परिक्रमा करत असतात. हे ठिकाण दत्त क्षेत्रातील , श्रीक्षेत्र गरुडेश्वर या नावाने प्रसिद्ध श्रद्धास्थान म्हणून ओळखले जाते .सदरहू श्रीक्षेत्र गरुडेश्वर स्थान महात्म्य विषयी लेख उपलब्ध झालेल्या माहितीच्या आधारे ,भक्त भाविकांच्या जनहितार्थ प्रसारित करण्यात आला आहे .

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top