"मित"चा चटका लावणारा मृत्यू..!

0

- उंचगावातील घटना : खणीत बुडून मृत्यू.

- कटलेला पतंग व केंदाळयुक्त खणीने घेतला चिमुकल्याचा  बळी.

- शालेय जीवनातच राहत्या ठिकाणी सर्व परिचित व्यक्तिमत्व. 


कोल्हापूर: (जनप्रतिसाद न्यूज विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली)

कटलेला पतंग मिळवण्यासाठी धावत गेलेल्या "मित" या शाळकरी चिमुकल्याचा खणीत बुडून दुर्दैवी व चटका लावणारा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली. ही  घटना उंचगाव (ता.करवीर, जि.कोल्हापूर ) येथे शनिवारी रात्री घडली. मित सचिन भंडारी असे त्याचे पूर्ण नाव असून प्रायव्हेट हायस्कूल या शाळेत तो इयत्ता पाचवीमध्ये शिकत होता . या दुर्दैवी व हृदय हेलावून टाकणाऱ्या घटनेमुळे संपूर्ण परिसरातील नागरिकांतून हळहळ व्यक्त करण्यात आली.

 "केंदाळयुक्त खणीत" आढळला "मित"चा मृतदेह

 घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी,  शनिवारी सायंकाळच्या सुमारास मित आपल्या मित्रांसमवेत खेळण्यास घराबाहेर गेला. यावेळी काही मुले पतंग उडविण्याचा आनंद घेत होती. यामधील एक पतंग कटला आणि हा कटलेला पतंग मिळवण्यासाठी मित हा धावत सुटला. धावत-धावत तो खणीजवळ गेला. खणीच्या पाण्यावर केंदाळ असल्यामुळे मैदानच समजून तो पतंग मिळवण्यासाठी सरळ खणीत गेला. केंदाळ असल्यामुळे त्यात तो अडकून राहिला. बराच वेळ झाला तरी मित अजून घरी आला नाही. याची जाणीव होताच त्याच्या आईने शोधा-शोध सुरू केली. शोध घेतल्यानंतरही तो मिळून न आल्यामुळे मितच्या आईने पतीसह शेजारी-पाजारी, परिसरातील नागरिक, नातेवाईक, मित्रपरिवार यांच्याकडे चौकशी केली. तसेच  पोलिसांना कळवले. या सर्वांनी मितला शोधण्यासाठी शनिवारी रात्री उशिरापर्यंत प्रयत्न केले. मात्र, अंधारामुळे त्याला शोधण्यात यश मिळाले नाही.रविवारी सकाळी पुन्हा शोध मोहीम सुरू केली. सकाळी नऊच्या सुमारास खणीत मितचा मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचे आढळून आले . मितच्या हातात पतंगाची दोरी व पुढे पतंग होता. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात हलवला. यावेळी त्याचा पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाल्याचे प्रशासनाने सांगितले.


 भंडारी कुटुंबीयांवर कोसळला दुःखाचा डोंगर

मितचे वडील सचिन हे खाजगी नोकरी निमित्त बाहेरगावी असतात तर आई खाजगी शिकवणी घेऊन आपल्या कुटुंबाला हातभार लावण्याचे काम करते आहे. मितला एक लहान भाऊ आहे. आपला मुलगा गेल्याचे त्यांना कळताच भंडारे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगरच कोसळला. आपल्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना माहिती होताच आई-वडिलांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. यावेळी परिसरातील नागरिक मित्रपरिवार यांच्यातून हळहळ व्यक्त करण्यात आली. उचगाव येथे रविवारी दुपारी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तर सोमवारी सकाळी रक्षाविसर्जन करण्यात आले. 


 केंदाळयुक्त खणीने घेतला बळी

ही खण केंदाळयुक्त असल्यामुळे पाणी न दिसता, मैदानासारखे दिसते. पतंग पकडण्याच्या नादात अंदाज न आल्यामुळे हा चिमुकला सरळ खणीत गेला आणि बुडाला.  या केंदाळयुक्त खणीने त्याचा बळी घेतला. प्रशासनाने यापूर्वीच याची गंभीर दखल घेऊन तत्काळ उपाययोजना करणे गरजेचे होते. आता तरी उपाययोजना होणार की, आणखी बळी जाण्याची वाट पहात आहे., अशा संतप्त प्रतिक्रिया या घटनेनंतर परिसरातील नागरिकांतुन उमटल्या.


" मित"ला "मी कोल्हापुरी" असल्याचा अभिमान

"मित"चे वडील सचिन भंडारी यांचे मुळगाव जळगाव आहे. नोकरी-कामानिमित्त ते कोल्हापुरात आले आणि कागलनंतर उचगाव येथे स्थायिक झाले. स्वभाव बोलका असल्याने मितने शाळेत जाताना देखील कधी त्रास दिला नाही. वडिलांचे मुळगाव जळगाव असल्याने तु जळगावचा आहेस, असं म्हणल्यानंतर तो माझा जन्म कोल्हापुरात झाल्याने "मी कोल्हापुरी" आहे. असा तो सार्थ अभिमानाने वडिलांना व नातेवाईकांना सांगत असे, अशी आठवण  त्याच्या वडिलांनी यावेळी बोलून दाखविली. 


मित"ने लहान वयातच जमवला "आबालवृद्धांचा" मोठा मित्रपरिवार 

"मित" ने आपल्या खेळकर स्वभाव व मितभाषी बोलण्यामुळे समव्यसकांबरोबर आबालवृद्धांचा मोठा मित्रपरिवार जमवला होता. "दोस्ती चौक" सह मंडळ व परिसरातील विविध उपक्रमात तो हिरीरीने सहभागी होत असे. यामुळे  लहान असूनही त्याची वडील सचिन यांच्यापेक्षा अधिक ओळख निर्माण झाली होती.  अभ्यासासह खेळातही उत्कृष्ट कामगिरी करून आपल्यातील क्षमतेची चुणूक दाखवून दिल्याने त्याचे नातेवाईक मित्र परिवाराकडून नेहमीच कौतुक केले जात होते. त्याच्या अचानक एक्झिटने या सर्वांना धक्काच बसला आहे. तर मित च्या जाण्याने भंडारी कुटुंबात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. दरम्यान, यातून पालक वर्गानेही बोध घेऊन  आपल्या कुटुंबातील सदस्य, मुलांचे पालनपोषण, शिक्षण व धावपळीच्या जीवनात त्यांची जबाबदारी पार पाडण्याला विशेष महत्त्व देणे गरजेचे बनले आहे.

Tags

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top