जे नियम जगभर तेच भारतात, एअरबॅग्सवरून नितीन गडकरींनी ऑटो कंपन्यांना सुनावलं...

0

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी वाहन उत्पादक कंपन्यांना आवाहन केलं की, त्यांनी छोट्या आणि किफायतशीर कार खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या सुरक्षेचा देखील विचार करायला हवा. गडकरी म्हणाले की, भारतात वाहनं विकणाऱ्या बहुतांश कंपन्या आधीपासून जगभरात ६ एअरबॅग्सवाल्या कार्सची निर्यात करत आहेत. आता त्यांनी भारतातही त्याच सुरक्षा मापदंडांचं (सेफ्टी स्टँडर्ड्स) पालन करायला हवं. दिल्लीतील ऑटोमोटिव्ह कंपोनंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या (एसीएमए) वार्षिक अधिवेशनाला बुधवारी गडकरी यांनी हजेरी लावली. या अधिवेशनाला संबोधित करताना गडकरी म्हणाले की, भारतात दरवर्षी ५ लाख रस्ते अपघात होतात, त्यामध्ये १.५ लाख लोकांचा मृत्यू होतो आणि ३ लाखांहून अधिक लोक जखमी होतात. गडकरी म्हणाले की, भारतातल्या बऱ्याच वाहन उत्पादक कंपन्या ६ एअरबॅग्स असणाऱ्या कार्सची निर्यात करत आहेत, मात्र याच कंपन्या भारतात ६ एअरबॅग्स देत नाहीत. आर्थिक मॉडेल आणि खर्चाचं कारण पुढे करून या कंपन्या ६ एअरबॅग्स देत नाहीत. गडकरी यांनी यावेळी आश्चर्य व्यक्त केलं की, भारतातल्या अनेक वाहन उत्पादक कंपन्या भारतात इकोनॉमी कार्सचा वापर करणाऱ्या ग्राहकांच्या आयुष्याचा विचार का करत नाहीत. भारतातले बहुतांश मध्यमवर्गीय लोक हे छोट्या आणि इकोनॉमी कार खरेदी करतात.

एअरबॅग्स ही एक व्हेईकल ऑक्यूपेंट-रिस्ट्रेंट सिस्टम आहे जी वाहनाची धडक होते तेव्हा चालक आणि वाहनाच्या डॅशबोर्ड किंवा स्टीअरिंगमध्ये फुग्याप्रमाणे फुगते. ज्यामुळे चालकाला कोणतीही मोठी दुखापत होत नाही. हीच एअरबॅग चालकाशेजारी आणि मागच्या सीटवर बसलेल्या प्रवाशांना देखील अपघाताच्या वेळी वाचवू शकते. गडकरी म्हणाले की, "देशातले अपघात कमी करण्यासाठी आम्हाला ऑटोमोबाईल उद्योगाच्या सहकार्याची गरज आहे. सुरक्षित कार तयार करण्यासाठी वाहन उत्पादक कंपन्यांमध्ये हेल्दी कॉम्पिटिशन (स्पर्धा) असली पाहिजे," केंद्र सकार या ऑक्टोबरपासून वाहन निर्मात्या कंपन्यांना किमान ८ सीटर वाहनांमध्ये ६ एअरबॅग्स देणं अनिवार्य करण्याचा प्रयत्न करत आहे. ऑटोमोबाईल कंपन्या सतत चिंता व्यक्त करत आहेत की हाय टॅक्स, वाहनांसाठीचे कडक सुरक्षा नियम आणि उत्सर्जन नियमांमुळे (एमिशन स्टँडर्ड्स) त्यांची उत्पादने महाग झाली आहेत. दरम्यान, या वर्षाच्या सुरुवातीला, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने एका निवेदनात म्हटलं आहे की, मोटर वाहनातील प्रवाशांची बाजूने होणाऱ्या धडकेपासून सुरक्षितता वाढवण्यासाठी, केंद्रीय मोटार वाहन नियम (सीएमव्हीआर), १९८९ मध्ये सुधारणा करून सुरक्षितता आणि फीचर्स वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


साईड/कर्टन एअरबॅग्स अनिवार्य केल्या जाणार


गडकरी यांनी सांगितलं होतं की, १४ जानेवारी २०२२ रोजी एक मसूदा अधिसूचना जारी करण्यात आली आहे. ज्यामध्ये म्हटलं आहे की, १ ऑक्टोबर २०२२ नंतर तयार करण्यात आलेल्या एम १ श्रेणीतल्या वाहनांमध्ये दोन साईड/साईड टोरसो एअरबॅग्स दिल्या जायला हव्यात. कारच्या फ्रंट रो आऊटबोर्डमध्ये बसणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी एक-एक एअरबॅग असेल. तसेच त्यांच्यासाठी दोन साईड कर्टन/ट्युब एअर बॅग्स, आऊटबोर्डवर बसणाऱ्या व्यक्तींसाठी एक-एक एअरबॅग दिली जाईल.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top