तासगाव मध्ये रथोत्सव जल्लोषात साजरा, सिद्धिविनायकाच्या रथोत्सवास लोटला गणेश भक्तांचा महासागर...

0

 जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क 

( अनिल जोशी ) 

सांगली जिल्ह्यातील तासगाव या गावातील श्री सिद्धिविनायकाच्या २४३व्या रथोत्सवास गणेश भक्तांचा अपूर्व असा जनसागर लोटला होता. महाराष्ट्र राज्याच्या अनेक कानाकोपऱ्यातून गणेश भक्त या रथोत्सवास येत असतात .अंदाजे अडीच लाखाच्या घरात गणेश भक्तांची उपस्थिती जाणवत होती. तासगावच्या पटवर्धन संस्थानाच्या सिद्धिविनायकाचा यंदाचा २४३ वा रथोत्सव हा भाद्रपद ऋषीपंचमीस झाला आहे .महाराष्ट्र राज्यातील अनेक गणेश भक्तांचे हे श्रद्धास्थान असून संस्थानचे सरसेनापती परशुराम भाऊ पटवर्धन यांनी सदरहू रथोत्सवाची परंपरा चालू केली आहे .अतिशय नयन मनोहर तीन मजल्यात असलेला व लाकडात कोरीव काम केलेला देखणा रथ हा या रथोत्सवाचा मुख्य भाग आहे .ह्या रथास लोखंडी चाके असून हा रथ गणेशभक्त भाविक दोरखंडाने ओढत ओढत नेऊन श्री सिद्धिविनायकास त्यांच्या वडिलांची भेट श्री काशी विश्वेश्वराच्या मंदिरात घडवून आणतात .रथात श्री सिद्धिविनायकाची पंचधातूची मूर्ती विराजमान झालेली असते तसेच संस्थांनचे राजे श्रीमंत राजेंद्र पटवर्धन यांचे सह पारंपारिक रितीरिवाजाप्रमाणे रथोत्सवाचे मानकरी या रथात बसलेले असतात. सुमारे दुपारी १वाजून १५ मिनिटांनी रथोत्सवास सुरुवात झाली व अंदाजे ३.३०च्या आसपास श्रींची मूर्ती परत प्रचंड उत्साहात व गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात श्रींचे  मूळ मंदिरात आली. रथोत्सवाच्या मार्गावर दुतर्फा असलेली गणेश भक्तांची गर्दी ही लक्ष वेधून घेत होती. 

रथातून गणेश भक्तांचे कडे खोबऱ्याचे तुकडे प्रसाद म्हणून उधळले जात होते .या रथोत्सवाचे सारथ्य श्रीमंत राजेंद्र पटवर्धन व डॉ. आदिती पटवर्धन यांनी केले .सायंकाळी राजप्रसादात श्रींच्या मानक-याना श्रीफळ देऊन रथयात्रा संपन्न झाली .या रथोत्सवाच्या वेळी महाराष्ट्राचे मंत्री शंभूराजे देसाई ,खासदार संजय पाटील ,राष्ट्रवादीचे युवक नेते रोहित पाटील ,भाजप नेते प्रभाकर पाटील उपस्थित होते .श्रींच्या रथोत्सवाच्या मार्गावर उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे, पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या अधिपत्याखाली प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. गणपती मंदिर ते समोर अर्धा किलोमीटरवर असलेल्या  काशीविश्वेश्वर मंदिरापर्यंत हा रथ ओढत नेला जातो. रथ ओढण्यास सुरुवात झाल्यानंतर  गुलाल व पेढय़ांची झालेली उधळण, युवकांनी रथासमोर केलेले मानवी मनोरे, झांज पथक, समोर दिमाखात चालणारी ‘गौरी’ हत्तीण यामुळे संपूर्ण वातावरण मंगलमय झाले होते. 

करोनामुळे तब्बल दोन वर्षांचा खंड पडल्यानंतर यंदा तासगावात गणेशोत्सव आणि रथोत्सव सोहळय़ात मोठा उत्साह दिसून आला. मराठा साम्राज्याचे शेवटचे सरसेनापती परशुरामभाऊ पटवर्धन यांनी इ. स. १७७९ मध्ये तासगावच्या श्री सिद्धिविनायक गणपतीची प्रतिष्ठापना केली. तेव्हापासून ही परंपरा अपवाद वगळता अखंड सुरू आहे.

रथोत्सव सोहळय़ात लाकडी कोरीव काम केलेला आणि लोखंडी चाके असलेला हा तीनमजली रथ भाविक दोराच्या साहाय्याने ओढतात. रथातून आणि रथाबाहेरून लाकडी ओंडक्यांच्या साहाय्याने रथावर नियंत्रण ठेवले जाते. या रथातून ’श्री गणेश’ पित्याच्या भेटीसाठी काशीविश्वेश्वर मंदिरापर्यंत जातात, तेथे आरती होऊन ते पुन्हा मंदिरात परततात, अशी आख्यायिका आहे. निर्बंधमुक्त वातावरणामध्ये तासगावचा २४३ वा रथोत्सव गुरुवारी मोठय़ा उत्साहात साजरा झाला. मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात श्रींची पंचधातूची मूर्ती असलेला रथ साधारण एक किलोमीटर अंतरावरील काशीविश्वेश्वराच्या दर्शनाला निघाला. त्या वेळी गणेशभक्तांनी गुलाल, पेढय़ांची उधळण केली. या वेळी रथाचे सारथ्य मराठय़ांचे अखेरचे सेनापती परशुरामभाऊ पटवर्धन यांचे वंशज राजेंद्र पटवर्धन यांनी केले. या रथोत्सवास दारूबंदी व उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई, खा. संजयकाका पाटील, राष्ट्रवादीचे युवक नेते रोहित पाटील आदींसह राजकीय, सामाजिक क्षेत्रातील अनेक  मान्यवर उपस्थित होते.

रथोत्सवादिवशीच गणपती पंचायतन संस्थानच्या ऐतिहासिक दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन होते. ’मंगलमूर्ती  मोरया, गणपती बाप्पा मोरया’ च्या जयघोषात, अलौकिक व नयनरम्य सोहळय़ात हा रथोत्सव पार पडला.  ‘मंगलमूर्ती मोरया’ च्या जयघोषात भाविक गणरायाचा रथ दोरखंडाच्या साहाय्याने ओढतात.


This news is co-provided by JanpratisadnewsPost a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top