सांगलीत संगीताचार्य द.वी. कानेबुवा प्रतिष्ठान संचलित गुरुकुल संस्थेच्या नवीन जागेत संगीत सभा संपन्न...

0 *जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क* 

 *(अनिल जोशी)* 


"संगीताचार्य द. वि. काणेबुवा प्रतिष्ठान संचालित गुरुकुल" सांगली येथे 2014 साली स्थापन झाले. शास्त्रीय संगीताचे रीतसर गुरुकुल पद्धतीने शिक्षण इथे दिले जाते. काल दिनांक 30 सप्टेंबर 2022 रोजी या गुरुकुलाचा नवीन जागेत वास्तुप्रवेश झाला. मारुती चौकातील गणेश मंगल कार्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील प्रशस्त जागेमध्ये आता गुरुकुल चालणार आहे. 

प्रसिद्ध गायिका विदुषी आरती अंकलीकर - टिकेकर यांच्या हस्ते आणि प. पू. कोटणीस महाराज, आमदार मा. सुधीरदादा गाडगीळ,चितळे डेअरीचे संचालक श्री. गिरीश चितळे आणि श्री. अरुण दांडेकर ह्या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत वास्तुप्रवेशाचा कार्यक्रम संपन्न झाला. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना संचालिका विदुषी मंजुषा ताई पाटील यांनी गुरुकुलाच्या आत्ता पर्यंतच्या कार्याचा संपूर्ण आढावा घेतला. संगीत दानाचे हे अनमोल काम आता भरपूर जोमाने व्हावे ही इच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली. यापुढे गुरुकुलाची स्वतःची जागा असावी अशी आपली इच्छा देखील त्यांनी व्यक्त केली.

भगवंतास संगीत अत्यंत प्रिय आहे. गुरुकुलाचा हा वृक्ष गगनास भिडो. नवीन पिढी घडवण्यासाठी मंजुषा ताई आणि बेडेकर काका यांना आमचे पूर्ण सहकार्य आहे. " कोटणीस महाराज"आत्ता गुरुकुलाचे स्वरूप छान झाले आहे. त्याची उत्तरोत्तर अशीच प्रगती होवो आणि अजून मोठे स्वरूप या कार्याला येवो अशी इच्छा मी व्यक्त करतो. " आमदार मा. सुधीरदादा गाडगीळ."हे गुरुकुलाचे स्वप्न पूर्ण होवो. ते आत्ता छान रुपाला येताना दिसतंय" गिरीश चितळे.

" शास्त्रीय संगीतासारखं दुसरं कोणताही संगीत या जगात नाही. रागसंगीत अत्यंत खास आहे आणि ते पुढे सुपूर्त करणं हे आमचं कर्तव्य आहे. योगाभ्यासबरोबर रागसंगीताची देखील समाजाला आवश्यकता आहे. शास्त्रीय संगीत शिकणाऱ्याच्या आई - वडिलांनी देखील कष्ट घ्यावे लागतात. गुरुकुलाची ही सुविधा इथे सांगली मध्ये मंजुषाने उपलब्ध करून दिली आहे. त्याचा भरपूर फायदा सर्वांनी करून घ्यावा. फक्त शिकण्यापूरते नव्हे, तर कला ही मेंदूच्या development साठी महत्वाची आहे. गुरुकुलाची मोठी इमारत होवो अशी इच्छा मी व्यक्त करते.

यानंतर गुरुकुलाची विद्यार्थिनी नुपूर देसाई हिने राग पुरीया धनश्री उत्तम पद्धतीने सादर केला. या मध्ये विलंबित तीलवाडा मध्ये "अदारांग नित" आणि द्रुत तीनतालामध्ये "आनावे मिल जानावे" ह्या बंदिशी तिने सादर केल्या. यावेळी उपस्थित रसिकांनी तिचे कौतुक केले. तिला तबल्यावर श्री. सौरभ सनदी आणि संवादिनीवर श्री. स्वरूप दिवाण यांनी समर्पक साथ केली.

कार्यक्रमाचा शेवट विदुषी आरती अंकलीकर टिकेकर यांनी आपल्या गायनातून केला. त्यांनी मारू बिहाग राग सादर केला. आणि त्यानंतर अनेक उपशास्त्रीय संगीताचे प्रकार त्यांनी गायला. त्यांना श्री. प्रशांत पांडव यांनी तबल्यावर आणि श्री. अभिनय रवंदे यांनी संवादिनीवर सुसंगत साथसंगत केली. आजच्या सांगलीतील गुरुकुल संस्थेमार्फत आयोजित केलेल्या संगीत सभेस संगीत क्षेत्रातील जाणकार तज्ञ व संगीत रसिकांनी उस्फूर्त उपस्थिती लावली होती.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top