चांदणी चौकातील उड्डाणपूल अखेर स्फोटाने जमीनदोस्त; काम पूर्ण होईपर्यंत वाहतूक बंदच

0
पाडणार, पाडणार म्हणून गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला मुंबई-बंगळुरू महामार्गावरील चांदणी चौकातील उड्डाणपूल अखेर शनिवारी मध्यरात्रीनंतर एक वाजता वाजता मर्यादित स्फोट घडवून काही क्षणांतच जमीनदोस्त करण्यात आला. पूल पाडण्यासाठी गेल्या दोन आठवड्यांपासून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, जिल्हा प्रशासन, पोलीस आणि तांत्रिक पथकाकाडून मोठ्या यंत्रणेच्या माध्यमातून तयारी करण्यात येत होती. पाडलेल्या पुलाचा राडारोडा हटिवण्याचे काम तातडीने सुरू करण्यात आले असून, राडारोडा उचलण्याचे काम पूर्ण होईपर्यंत या भागातील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. चांदणी चौक आणि परिसरात सकाळी आठवाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. स्फोट घडवून पाडण्यात आलेला पुण्यातील हा पहिलाच पूल असल्याने नागरिकांमध्येही त्याबाबत प्रचंड उत्सुकता होती. महामार्गावरील चांदणी चौकात होणारी सातत्याने वाहतूक कोंडी सोडण्याच्या दृष्टीने पूल पाडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. कमी वेळेत पूल पाडून त्याचा राडारोडा जमा करणे आणि वाहतूक कमी वेळेत पूर्ववत करण्यासाठी पूल स्फोटकाने पाडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार कोची आणि नोएडा येथील जुळे मनोरे पाडणाऱ्या कंपनीलाच हा पूल पाडण्याचे काम देण्यात आले. याच कंपनीने पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील अमृतांजन पूल पाडण्याचे काम केले आहे. कंपनीच्या तांत्रिक कर्मचाऱ्यांनी सुरुवातीला पुलाची आणि परिसराची पाहणी केली. त्यानंतर स्फोटके भरण्यासाठी छिद्रे पाडण्यात आली. त्यानंतर गेल्या चार ते पाच दिवसांपासून विविध तांत्रिक कामे पूर्ण करण्यात आली. त्यापूर्वी शुक्रवारी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या परिसराची हवाई पाहणी केली. पूल पाडण्यासाठी सुमारे सहाशे किलो स्फोटकांचा वापर करण्यात आला. तांत्रिक रचनेनुसार घेतलेल्या १५०० हजार छिद्रांमध्ये ही स्फोटके भरण्यात आली होती. शनिवारी सकाळपासून तांत्रिक पथकाकडून पूल पाडण्याच्या कामाची अंतिम तयारी करण्यात येत होती. शनिवारी रात्री सातारा आणि मुंबईकडून येणारी वाहतूक टप्प्याटप्प्याने थांबविण्यात आली. मुंबईकडून येणाऱ्या वाहतुकीतील हलकी वाहने तळेगाव येथूनच पर्यायी मार्गाने वळविण्यात आली. रात्री उशिरा चांदणी चौकाच्या परिसरातील सर्व भाग निर्मनुष्य करण्यात आला. स्फोटाच्या परिसरात ठरावीक जबाबदार अधिकारी आणि तांत्रिक पथकाचीच उपस्थिती होती. तांत्रिक पथकाला सूचना मिळताच केवळ काही सेकंदाच्या अंतराने दोन स्फोट घडवून पूल पाडण्यात आला.

– मुंबई- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील मुंबईकडून येणारी जड वाहतूक ही ऊर्से टोलनाका येथेच थांबविण्यात आली आहे.

– साताऱ्याकडून येणारी जड वाहतूक ही खेड शिवापूर टोलनाक्याजवळ थांबविण्यात आली आहे.

– महामार्गावरील शिंदेवाडी ते ऊर्से टोलनाका या दरम्यान दोन्ही बाजूने सर्व प्रकारच्या जड वाहनांच्या वाहतुकीस बंदी करण्यात आली आहे.

– महामार्गावरील डुक्कर खिंड ते पिंपरी-चिंचवड आयुक्तालय हद्दीतील घोडावत चौक या दरम्यान दोन्ही बाजूने सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीस बंदी करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top