तिच्या देहाचे पस्तीस तुकडे केले! हात थरकापले कसे नाहीत त्याचे?

0

 
(जनप्रतिसाद) न्यूज नेटवर्क :---


श्रद्धा वाळकर आपल्या वसईमधली मध्यमवर्गीय कुटुंबातील तरुणी होती. नोकरीत असताना तिची आफताब अमीन पूनावाला या तरुणाशी ओळख झाली. आफताब अमीन पूनावाला हा देखील वसईचा रहिवासी आहे. वसईतील सेंट फ्रान्सिस हायस्कूलमध्ये त्यांचे शिक्षण झालेय. त्याने मुंबईतील एलएस रहेजा कॉलेजमधून बीएमएस पदवी घेतली. व्यवसायाने तो फूड ब्लॉगर आहे, तो इंस्टाग्रामवर ‘हंग्रीचोक्रो’ नावाने फूड ब्लॉग चालवतो.

मुंबईतील कॉल सेंटरमध्ये काम करत असताना लिव्ह-इन पार्टनर श्रद्धाशी भेट झाली. तर श्रद्धा ही पूर्वी वसई पश्चिम येथील संस्कृती कॉम्प्लेक्समधील रिगल अपार्टमेंटमध्ये राहात होती. आरोपी आफताब हा देखील परिसरात राहत होता. मुंबईत काम करत असताना दोघांचे प्रेम झाले. श्रद्धा एका मल्टीनॅशनल कंपनीच्या कॉल सेंटरमध्ये काम करत होती.


दोघांच्याही कुटुंबियांनी त्यांचे नाते स्वीकारण्यास नकार दिला तेव्हा हे जोडपे दिल्लीत स्थलांतरित झाले आणि छतरपूर परिसरात, मेहरौली येथे भाड्याच्या अपार्टमेंटमध्ये राहू लागले अशी माहिती समोर येतेय. तिथे ते लिव्हइन रिलेशनशिपमध्ये राहिले. काही महिन्यांनी तिने लग्न करण्याचा तगादा लावला. त्याने नकार दिला आणि त्यानंतर तिचं जे काही केलं ते काळजाचा थरकाप उडवणारं आहे, माणूसकीला काळीमा फासणारं नि प्रेम या शब्दाला बदनाम करणारं आहे.


या पाशवी नराधमाने आपल्या प्रेयसीचा उपभोग तर घेतला मात्र नात्याला नाव द्यायची वेळ आल्यावर तिचा खून केला. तिच्या देहाचे पस्तीस तुकडे केले! हात थरकापले कसे नाहीत त्याचे?


त्यानंतर त्याने तीनशे लिटर क्षमतेचा फ्रिज आणून त्यात तिच्या देहाचे तुकडे ठेवले. रोज मध्यरात्री दोन वाजल्यानंतर तो घराबाहेर पडायचा नि दिल्लीच्या सर्वदूर भागात तिच्या देहाचे तुकडे टाकून यायचा. असं त्यानं तब्बल अठरा दिवस केलं.


श्रद्धाची सोशल मीडियावरची अनुपस्थिती लक्षात येताच घटनेनंतर सहा महिन्यांनी तिच्या पालकांनी मिसिंग तक्रार दाखल केली. पोलिसांनी आफताबला बोलतं केल्यावर त्याने सारं ओकलं.


हाच आफताब सोशल मीडियावर पर्यावरण, स्त्रीमुक्ती, खरे स्त्रीसौंदर्य यासह एलजीबीटी कम्युनिटीवर आधारित लिंगभेदमुक्ती विषयीच्या गप्पा हाणताना दिसतो. 

त्याच्या पोकळ नैतिकतेच्या मुखवट्याआडचा चेहरा अत्यंत क्रूर हिंसक नि अमानवी आहे हे त्या मुलीला कळले नसेल! 

इथे असे फसवे मुखवटे कितीएक असतील. म्हणून तरी  माणसांची पारख असली पाहिजे. 


'प्रेम सांगून वा ठरवून होत नाही' हे मी देखील मानतो मात्र आपण ज्याच्यासोबत आयुष्य काढण्याची स्वप्ने रंगवतो त्याचे विचार काय आहेत, त्याची मनोवृत्ती कशी आहे, त्याचं आपल्यावर खरेच प्रेम आहे का, शरीराच्या उपभोगानंतर पुढे काय असणार आहे, आपल्या नात्याला  ओळख मिळणार आहे का, प्रेमाआडून आणखी काही साध्य करण्याचा छुपा हेतू आहे का इत्यादी बाबींवर किमान विचार तरी केला पाहिजे.


अलिकडच्या काळात अशा घटना सातत्याने घडत असूनही मुलींचे डोळे का उघडत नसावेत? 'प्रेम आंधळं असतं' हा फिल्मी डायलॉग आताच्या खुल्या नि मोकळ्या वातावरणाच्या काळात उचित वाटत नाही. नीटनेटका विचार करुन, चौकसपणे माहिती घेऊन, सारासार विवेक न गमावता पुढचे निर्णय घेतले पाहिजेत. जन्मदात्यांच्याच मर्जीनेच आयुष्याचा जोडीदार निवडणं सक्तीचं नसलं तरीही त्यांच्या मतांचा, विचारांचा साधक बाधक विचार करायला हरकत नसावी.


आफताबच्या घोर अपराधाची त्याला शिक्षा मिळालीच पाहिजे. त्याने ज्या थंड डोक्याने, कमालीच्या निर्ममतेने श्रद्धाचा खून करत तिच्या देहाची जी विल्हेवाट लावलीय ती पाहता त्याच्यातल्या क्रौर्याची, निर्विकारपणाची, अमानवी वृत्तीची कल्पना यावी. या क्रूरकर्म्यास फासावरच लटकवले पाहिजे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top