*सांगलीतील कवलापूरला कोणत्याही परिस्थितीत विमानतळ खेचून आणू असा विमानतळ बचाव कृती समितीच्या बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांचा बैठकीत निर्धार--*

0

 *सांगलीतील कवलापूरला कोणत्याही परिस्थितीत विमानतळ खेचून आणू असा विमानतळ बचाव  कृती समितीच्या बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांचा  बैठकीत निर्धार--* 


 *जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क* 

( *अनिल जोशी)* आज सांगलीतील पाटीदार भवन मध्ये विमानतळ बचाव कृती समितीच्या सर्वपक्षीय नेत्यांची एक बैठक संपन्न झाली. " *विमानतळ रद्द करण्याच्या ठरावाची" होळी करण्याचा, विमानतळ बचाव कृती समितीच्या सर्वपक्षीय नेत्यांनी निर्धार केला.* कवलापूर विमानतळ हे सांगलीकरांचे स्वप्नच नव्हे, तर पुढील शंभर वर्षांच्या विकासाची दिशा ठरवणारा तो केंद्रबिंदू आहे. कितीही संघर्ष करावा लागला तरी चालेल, मात्र पुढच्या पिढ्यांच्या कल्याणासाठी ते आपणास साध्य करायचेच आहे. सांगलीकरांची अभेद्य एकजूट दाखवू आणि कवलापूरला विमानतळ खेचून आणू, असा निर्धार आज विमानतळ बचाव कृती समितीच्या बैठकीत सर्वपक्षिय नेत्यांनी केला.विमानतळाच्या निमित्ताने येथील पाटीदार भवनमध्ये आयोजित बैठकीत पक्षविरहीत एकजूट दिसून आली. सर्वपक्षिय नेत्यांना अगदी निर्धारपूर्वक या विषयाला बळ देण्याचे जाहीर केले. समितीचे नेते सतीश साखळकर यांनी स्वागत केले. निमंत्रक पृथ्वीराज पवार यांनी प्रास्ताविक केले. महापौर दिग्विजय सूर्यवंशी, माजी आमदार दिनकर पाटील, माजी आमदार नितीन शिंदे, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे सांगली विधानसभा क्षेत्राध्यक्ष पद्माकर जगदाळे, नगरसेवक हणमंत पवार, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ ठोकळे, व्यापारी एकता आंदोलनचे समीर शहा, भाजपचे गौतम पवार, स्वाभिमानीचे महेश खराडे, संदीव राजोबा यांच्यासह विविध पक्षातील मान्यवरांनी एका सुरात विमानतळाचा नारा दिला. *सतीश साखळळर यांनी विमानतळाच्या लढ्याची सुरवात, तांत्रिक अडचणी, कागदपत्रांची उपलब्धता आणि लढ्याची सध्याची स्थिती याचे विस्तृत विवेचन केले.* विमानतळाच्या लढ्याला लोकांचा अद्‍भूत प्रतिसाद मिळत असल्याबद्दल समितीतर्फे आभार व्यक्त केले. ‘उडाण मॅरेथान’ची संकल्पना मांडतानाच लवकर त्याची तारिख जाहीर करू, त्यावेळी समस्त सांगली जिल्ह्यातील जनता रस्त्यावर असेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

पृथ्वीराज पवार म्हणाले, ‘‘विमानतळाची मागणी हा सामान्य विषय नाही. हा शंभर वर्षांचे भवितव्य घडवणारा लढा आहे. आपण एकजूट दाखवून सरकारचे लक्ष वेधून घ्यायचे आहे. हा जनरेटा कुणाच्या विरोधात नाही, हा सांगलीच्या हिताचा आवाज म्हणून पुढे आला आहे. विमानतळाचे हजारो हातांना काम मिळणार आहे. दक्षिण महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकचा केंद्रबिंदू म्हणून हे विमानतळ विकसीत होऊ शकेल, असा आम्हाला विश्‍वास आहे.

शेखर इनामदार म्हणाले, ‘‘विमानतळ म्हणजे आम्ही खूप मोठे काही मागत नाही. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आम्ही भेटलोय. सांगलीची जनतेची भूमिका कानी घातलीय. ते सकारात्मक आहेत. आता आपण एकेक टप्पा पुढे जावू, कृती कार्यक्रमातून विमानतळाच्या मंजुरीपर्यंत पाठपुरावा करू. कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक हेही आपल्यासोबत आहेत.’’

विशाल पाटील यांनी

टोचले नेत्यांचे कान

विशाल पाटील म्हणाले, ‘‘विमानतळाला मनापासून राजकीय पाठींबा असता तर हा विषय १५ वर्षे मागे पडला नसता. धावपट्टीला जागा कमी पडते, ती विकत घेणे कठीण नाही. आमच्या इच्छाशक्तीचा भाग आहे. आमचे स्वार्थ असतात तेंव्हा काही करून आम्ही जागा रिकाम्या करतो. विमानतळाच्या विषयात नसती कारणे पुढे केली गेली. आता जनतेची भूमिका अधिक महत्वाची आहे. २००९ सालचा विमानतळ रद्दचा ठराव विधानसभेतून रद्द करण्यासाठी प्रयत्न व्हावेत. कृती आराखडा करून एकेक टप्पे पुढे जावूया.’’  

*शरद पवारांचीही साथ* 

पृथ्वीराज पाटील म्हणाले, ‘‘प्रत्येक ग्रामपंचायत, नगरपंचायतींचे ठराव जमवून केंद्रीय उड्डाण मंत्र्यांकडे व्यापक बैठक लावणे गरजेचे आहे. त्यात सर्व अधिकारी, आपले शिष्टमंडळ असेल. या मागणीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही साथ देण्याचे कबूल केले आहे.  

महापौर दिग्विजय सूर्यवंशी म्हणाले, ‘‘आपले कुशल मनुष्यबळ पुणे, मुंबईकडे जात आहे. येथे विमानतळ झाले तर उद्योग येतील, तरुणांना स्थानिक पातळीवर रोजगार मिळतील. त्यासाठी जिल्हाभरातून एकजूट दाखवू, तसे ठराव करून घेऊ.’’

दिनकर पाटील म्हणाले, ‘‘विधानसभा अधिवेशन सुरु आहे, तोवर विमानतळाचा ठराव करून घेतला पाहिजे. हा व्यापारी, उद्योजक आणि सर्वसामान्य माणसाचा लढा आहे.’’

नितीन शिंदे म्हणाले, ‘‘विमानतळ जागा विक्रीचा श्री श्रीष्ठा कंपनीसोबत झालेला व्यवहार हाणून पाडला, हे आपले मोठे यश आहे. विमानतळासाठी विधानसभा, लोकसभेत आवाज उठला पाहिजे. संपूर्ण जनता त्यासाठी रस्त्यावर येईल.’’

समीर शहा म्हणाले, ‘‘काही दलालांना उद्योजकांना हाताशी धरून जागा हडपण्याचा प्रयत्न केला. असल्या भानगडी आम्ही कधी चालू देणार नाही. विकास खड्ड्यात घालून मलिदा लाटणाऱ्या प्रवृत्तींना त्यांची जागा दाखवून देऊ. विमानतळ झालेच पाहिजे, यासाठी व्यापारी संपूर्ण ताकद देतील.’’

पद्माकर जगदाळे म्हणाले, ‘‘आपण अशी एकजूट दाखवली तर विकासाचा टेक-ऑफ शक्य आहे. सांगलीकरांच्या अंगातील पाणी दाखवून देण्याची हीच वेळ आहे.’’  

महेश खराडे म्हणाले, ‘‘प्रसंगी कायदेशीर लढाईचा मार्ग निवडू. त्याआधी विमानतळाचे संकल्पचित्र लोकांसमोर मांडून त्याची भव्यता समोर आणूया.’’

संदीप राजोबा म्हणाले, ‘‘लेकराबाळांसह विमान प्रवासाचे प्रत्येकाचे स्वप्न असते. त्या स्वप्नांसाठीची ही लढाई आहे आणि त्यात शेतकरी तुमच्या सोबत आहेत.’’

हणमंत पवार म्हणाले, ‘‘विमानतळावर भूखंड पाडण्याच्या औद्योगिक महामंडळाच्या हालचाली आजही सुरु आहेत, त्या आधी थांबल्या पाहिजेत.’’

अनिल कवठेकर म्हणाले, ‘‘विमानतळ नाही या कारणास्तव कित्येक मोठे उद्योग अडचणीत आले, कोट्यावधीच्या ऑर्डर रद्द झाल्या याचे आम्ही साक्षीदार आहोत.’’

कृष्णा व्हॅलीचे रमेश आरवाडे म्हणाले, ‘‘उद्योग विकासासाठी विमानतळ हवेच आहे. काही चुका आमच्याकडून झाल्या, मात्र आता विमानतळासाठी पूर्ण ताकद आम्ही देऊ.’’

उमेश देशमुख यांनी आभार मानले. विमानतळाला विरोध करणाऱ्या झारीतील शुक्राचार्याला शोधून बाजूला केले पाहिजे, असा टोला त्यांनी लगावला.

कुपवाड एमआयडीसीचे अतुल पाटील, नावेद, अनिल कवठेकर, शिवसेनेचे सुरेश साखळकर, वंचित बहुजन आघाडीचे किरण कांबळे, आरपीआयचे सुरेश दुधगावकर, नगरसेवक अमर निंबाळकर, विकास सूर्यवंशी, युवराज शिंदे, मराठा समाजचे डॉ. संजय पाटील, नितीन चव्हाण, वाहतूकदार संघटनेचे महेश पाटील, काँग्रेसचे आशिष कोरी, तसेच अविनाश जाधव, प्रशांत भोसले, निलेश पवार,

*प्रमुख ठराव* 

विमानतळ रद्दचा सन २००९ चा ठराव विधानसभेत रद्द करायला लावणे

- औद्योगिक विकास महामंडळाकडून भूखंड पाडण्यासाठीच्या हालचाली थांबवणे

- औद्योगिक विकास महामंडळाकडून जागा पुन्हा विमान प्राधीकरणाकडे वर्ग करणे

- गायरान जमिन खासगी उद्योजकांना विकण्याचा घाट घालणाऱ्यांना जाब विचारणे

- खासदारांनी लोकसभेत, आमदारांनी विधानसभेत विमानतळासाठी आवाज उठवणे

- सांगलीकरांची एकजूट दाखवण्यासाठी मॅरेथॉन, मॉर्निंग वॉक, प्रतिकात्मक आंदोलन करणे

- पहिले विमान उतरले त्या दिवशी विमानतळाचा वाढदिवस साजरा करणे

*जागा द्यायला तयार--* 

कवलापूर सोसायटीचे अध्यक्ष शिवाजी पाटील म्हणाले, ‘‘कवलापूर विमानतळाला आवश्‍यक जागा आम्ही द्यायला तयार आहोत. योग्य मोबदला मिळायला हवी. त्यासाठी आम्ही यादी कृती समितीकडे देत आहोत.’’ अशा रीतीने आजची विमानतळ बचाव कृती समितीची सर्वपक्षीय नेत्यांची बैठक संपन्न झाली.

Tags

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top