*राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमात जिल्ह्याला राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर* *डॉ. उषादेवी कुंभार यांनी स्विकारला पुरस्कार*

0

*प्रतिनिधी: मिलिंद पाटील*

कोल्हापूर, दि. 31-03-2023



         राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत उद्दिष्टांची १०० टक्के पूर्तता केल्याबद्दल कोल्हापूर जिल्ह्याची राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड होवून जिल्ह्याला चौथा क्रमांक मिळाला. यासाठीचा पुरस्कार नुकताच आरोग्य सेवा (कुष्ठरोग व क्षयरोग) पुणे  सहसंचालक डॉ. सुनिता गोल्हाईत तसेच जे. जे. वैद्यकीय महाविद्यालय, मुंबईचे प्राध्यापक  डॉ. ललित संख्ये,  राष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य प्रशिक्षण व संशोधन संस्था, मुंबईचे संचालक डॉ. सुनिल गिते व पी एच एस जी - 1 ए एच ओ मुंबईचे डॉ. विजय भगत  यांच्याहस्ते मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. कुष्ठरोग विभागाच्या सहायक संचालक डॉ. उषादेवी कुंभार यांनी हा पुरस्कार स्वीकारला. तसेच उत्कृष्ट अवैद्यकीय पर्यवेक्षक अनिल शास्त्री, अवैद्यकीय सहाय्यक डी. एम. मंदुळकर तसेच सांख्यिकी सहाय्यक निशांत कुंदे यांना मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत सन २०२२-२३ वर्षामध्ये नवीन कुष्ठरुग्ण शोध कार्य उद्दिष्टांची पूर्तता तसेच विकृती दर्जा दोनच्या रुग्णांचे प्रमाण कमी असणे, लहान वयातील मुलांची रुग्ण संख्या कमी असणे तसेच विकृती असलेल्या रुग्णांना भौतिकोपचार व त्यांना आवश्यक असलेल्या सेवा १०० टक्के पुरवण्यात आल्या बद्दल जिल्ह्याला हा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला आहे.

 
       कोल्हापूर जिल्ह्यासाठी प्रथमच पुरस्कार मिळाल्यामुळे ही बाब अभिमानाची असून यासाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, कुष्ठरोग विभागाच्या सहाय्यक संचालक डॉ. उषादेवी कुंभार यांनी परिश्रम घेतले. डॉ. उषादेवी कुंभार यांनी कुष्ठरोग कार्यक्रमाचा तालुका स्तरावर तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र स्तराचा नियमित आढावा घेऊन मार्गदर्शन केले. तसेच कुष्ठरोग शोध अभियान, स्पर्श जनजागृती अभियान अंतर्गत वेळोवेळी मार्गदर्शन केल्यामुळे कुष्ठरोग कार्यक्रम चांगल्या पध्दतीने राबविण्यात आला. तसेच वैद्यकीय अधिकारी, डीएनटी, वैद्यकीय अधिकारी सुलु सर्व अवैद्यकीय पर्यवेक्षक, अवैद्यकीय सहाय्यक, कुष्ठतंत्रज्ञ, सांख्यिकी सहाय्यक,  तालुका आरोग्य अधिकारी तसेच तालुका स्तरावरील आरोग्य सहाय्यक व प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सर्व आरोग्य सहाय्यक, सहाय्यिका, आरोग्य सेवक, सेविका, आरोग्य कर्मचारी गटप्रवर्तक, सर्व आशा स्वयंसेविका यांचेही कुष्ठरोग कार्यक्रमांतर्गत सर्व उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी प्रयत्न केले. राज्यस्तरीय पुरस्काराबद्दल डॉ. उषादेवी कुंभार यांनी सर्व सहकाऱ्यांचे आभार मानून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top