शनिशिंगणापूर देवस्थानातील बांधून ठेवलेली महाघंटा ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’च्या मागणीनंतर भाविकांसाठी खुली !

0


 जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क

(अनिल जोशी)

श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर येथील श्री शनैश्चर मंदिराच्या मुख्यद्वारात असलेली महाघंटा देवस्थानच्या कार्यालयास अडथळा येतो, म्हणून मागील 3-4 वर्षांपासून बांधून ठेवण्यात आली होती. मुळात घंटा वाजवणे हा मंदिरातील एक महत्त्वाचा धार्मिक आचार आहे. घंटा वाजवल्यानंतर देवतातत्त्व जागृत होते, तसेच वातावरणात सात्त्विकता प्रक्षेपित असे धर्मशास्त्र आहे. असे असतांना केवळ कार्यालयात अडथळा येतो म्हणून ती बंद ठेवणे सर्वथा अयोग्य आहे. म्हणून हिंदूंच्या संवैधानिक धार्मिक अधिकारांचा विचार करून श्री शनी मंदिरातील महाघंटा वाजवण्याची परंपरा पुन्हा चालू करावी, या मागणीचे निवेदन ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’च्या वतीने श्री शनैश्चर देवस्थानचे अध्यक्ष श्री. भागवत बानकर आणि उपाध्यक्ष श्री. विकास बानकर अन् श्री. विश्वास (मामा) गडाख यांना देण्यात आले. या निवेदनाची तात्काळ दखल घेत श्री. बानकर यांनी मंदिराच्या मुख्यद्वारात बांधून ठेवण्यात आलेली महाघंटा सोडून भाविकांसाठी खुली केली. त्यावर भाविकांनी ‘हर हर महादेव’चा जयघोष करत घंटानाद केला. महासंघाच्या आवाहनानंतर देवस्थानने तत्परतेने कृती केल्याविषयी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चे समन्वयक श्री. सुनील घनवट यांनी देवस्थानचे आभार मानले आहेत.

हे निवेदन देण्यासाठी ‘विघ्नहर्ता प्रतिष्ठान’चे श्री. योगेश सोनवणे, ‘श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’चे श्री. बापू ठाणगे, ‘हिंदु जनजागृती समिती’चे श्री. रामेश्वर भुकन, तसेच सर्वश्री ज्ञानेश्वर जमदाडे, सागर खामकर, सतीश बावरे, अमोल तांबे, अशोक मैद, अमोल वांढेकर आणि सुरज गागरे उपस्थित होते.  

हिंदु मंदिरांमध्ये धार्मिक पूजापद्धतीनुसार मंदिरात घंटा वाजवणे, शंख वाजवणे किंवा आरती करणे हे शास्त्रशुद्ध धार्मिक आचार आहेत. श्री शनी मंदिरातील महाघंटा बंद असल्याने हिंदूच्या प्रथा, परंपरा आणि भक्तांच्या धार्मिक भावनांचा प्रश्न निर्माण झाला होता. मंदिरातील घंटा वाजवणे तात्काळ चालू करावे, अशी मागणी मंदिर महासंघाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली होती. यापूर्वीही हिंदूंचे भाग्यनगर (हैद्राबाद) येथील प्रसिद्ध आराध्यस्थान असलेले श्री भाग्यलक्ष्मीदेवी मंदिराची घंटा धर्मांधांना त्रास होतो म्हणून अशाच पद्धतीने बंद करण्यात आली होती. या संदर्भात भाग्यनगर येथील देवीभक्तांनी उच्च न्यायालयात लढा दिला होता. यात न्यायालयाने मंदिरात घंटावादन हे भक्तांच्या प्रथा परंपरेचा मुख्य भाग असून भारतीय संविधानाच्या कलम 25 अंतर्गत मूलभूत हक्क आहे, असे म्हटले होते. मंदिरांतील प्रथा-परंपरा, धार्मिक आचार यांवर बंधने आणली जात असतील, तर मंदिर महासंघ त्यासाठी लढा देत राहिल, असेही श्री. घनवट यांनी या वेळी सांगितले.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top