कोकणात साजरा केल्या जाणाऱ्या गणपती उत्सवा प्रमाणे, गणेशोत्सव साजरा केला तर,आपली "कुटुंब संस्कृती" अजून मजबूत बनेल ! जनहितार्थ एक सुंदरसा टाकलेला दृष्टिक्षेप.!

0

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अनिल जोशी)

कोकणात आई-वडिलाच्या घरातच गणपती बसतो.आई-वडीलाच्या पश्चात थोरल्या मुलाच्या घरी किंवा जो आई-वडिलाच्या घरात राहतो. फक्त त्यालाच गणपती बसवण्याचा अधिकार असतो, हा तेथील कडक सामाजिक नियम आहे.नोकरीच्या निमित्ताने चार भावांची शहरात किंवा गावात चार घरे असली तरी,मुळ घरातच गणपती एकच बसवतात व सर्व भाऊ व त्यांची बायका,मुले तिथे एकाच चुलीवर,दहा दिवस जेवण बनवून त्या घरात राहतात.भावा-भावात कितीही भांडणे असले तरी,या दहा दिवसात एकत्र राहणे,एकत्रच स्वयंपाक करून जेवणे व तिथेच झोपणे हा तिथला कडक नियम आहे.असे गणपती मुळे एकत्र आल्याने कधी-कधी जुने भावांतील वाद एकत्र आल्याने मिटले जातात.नाही मिटवायचे तरी दहा दिवस कोणीही घरात वाईट बोलणे,भांडण करणे मनाई असते नाहीतर देवाचा कोप होईल ! या श्रध्देने सर्वजण मोठी माणसे एकत्र आनंदाने राहतात. मुले तर लगेच एकमेकांत मिसळून जातात.

कोकणात या गणपती सणाच्या निमित्ताने आपलं घर,संपूर्ण गावं भरून जातं.आपुलकीला उधाण येतं.माणसं एकत्र येतात, भेटतात,भजने,दशावतार,शक्ती तुरा नाच,नमन भारुड,कथा इत्यादी रात्री कार्यक्रम उत्साहात  करतात आणि पुन्हा आपापल्या शहरात पोटं भरण्यासाठी गणपती सणानंतर निघून जातात..! गणपतीत झालेली माणसांची गर्दी आणि दारासमोर झालेली पादत्राणांची,पाऊलांची दाटी,दहा दिवस सर्व कुटुंब एका छताखाली येणं,गुण्या-गोविंदाने रहाणं आणि सुख-दुःखाच्या गप्पा गोष्टी करणं... पोरांनी आई म्हणून मारलेली प्रेमळ हाक,दिरानी वहिनींकडे हक्काने मागीतलेला कपभर चहा,तुम्ही राहू द्या,मी करते असा एका जावेने,दुसऱ्या जावेला केलेला प्रेमळ हट्ट हे कोकणात गावा-गावात,घरा-घरात पहायला मिळते.

योग्य वेळी,योग्य वागणं आणि घर नावाच्या मंदिराच्या भिंतीला तडे न जाऊ देणं,हे सर्व कोकणात आहे, मात्र कोकणाच्या बाहेर प्रेम,माया संपत चालली आहे.एक भाऊ कारमधून फिरतोय आणि एकाकडे सायकल पण नाही.एका आई-वडिलाची मुले पण द्वेष,मत्सर वाढत चाललाय.त्यांने मोटारसायकल घेतली की,लगेच दुसरा भाऊ कर्ज काढून कार घेतोय, ही कोकण बाहेरील परिस्थिती आहे.दुसऱ्या भावाला मदत करायची नाही या ईर्षेने एक एक भाऊ पेटलेला आहे.आपल्याच आई वडिलाचा विसर पडलेला आहे. तर मग गावटगे बसलेत, तुमच्यात भांडणे लावायला व सर्रास भाऊ याला बळी पडतात.संपत्तीवरून बहीणीत वाद आहेत तर तिच्याकडे बघत पण नाहीत.काय मागते ते द्या ना. बहीण, भावापुढे कसला स्वार्थ धरताय हा ? एकाच आईच्या उदरातून येवून माता ऐवजी मातीसाठी,जमीनीसाठी भांडता,हे केवढे कुटुंबाचे दुर्दैव आहे.  

कोकणासारखे वागून बघावे कोकणात एकाही शेतकऱ्यांने आजपर्यंत आत्महत्या केली नाही.तिकडे चार एकर म्हणजे मोठा शेतकरी,नाहीतर कोकण बाहेर दहा एकरवाला आत्महत्या करतोय.त्याला कारण मोठेपणा व विभक्त कुटुंब पद्धतीमुळे विचाराची देवाणघेवाण होत नाही. साधेपणा जपावा,कुटुंबाने वर्षातून दहा दिवस अशा सणाला एकत्र येवून घरी दरवर्षी कोकणा प्रमाणे दहा दिवसाचा सण साजरा करावा.गौराई बसवतात तसे दोन दिवस बहीणीला घरी बोलवून,मातीच्या गौराईवर प्रेम करतात.तसेच आपल्याच  बहिणीला,कमीत कमी पुरणपोळी घासाचा तिला पाहुणचार केला पाहीजे. जिवंतपणी आई-बापानी हे पाहिले तर ते गदगद् होतील व नसतील तर त्यांचा आत्मा सर्वास एकत्र पाहून आनंदीत होईल,ही भोळी अपेक्षा जरी असले तरी प्रेम, कुटुंबाचे एकत्रित येण्यामुळे, द्विगुणित होईल. व पुढील वर्षासाठी भावांचे-बहिणींचे,भावा भावांचे एकमेकाला चांगले आर्शिवाद मिळतील,यात तिळमात्र शंका नाही. 

सदरहू लेख हा संपादन करून,जनहितार्थ प्रसिद्ध करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top