कोल्हापुरात,आदिलशाही राज्यात लपविलेली करवीर निवासिनी अंबाबाईची मूर्ती,छत्रपतींनी पुन्हा मूळ मंदिरात स्थापन केली,तो आजचा ऐतिहासिक सोनेरी दृष्टिक्षेप व दिनविशेष.!

0

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अनिल जोशी)

वरील संग्रहित छायाचित्र - करवीर निवासिनी अंबाबाईच्या मूर्तीचे शंभर वर्षांपूर्वी टिपलेले ऐतिहासिक छायाचित्र आहे.

मुस्लिम राजवटीतील बादशाह्यांच्या काळात कोल्हापूर प्रांतावर आदिलशहाचा ताबा होता.या काळात सर्वत्र धामधूम माजलेली असायची. राज्यव्यवस्था स्थिर नव्हती.युद्धप्रसंगी मंदिरांची नासधूस केली जायची.अशावेळी देवीच्या मूर्तीस काही अपाय पोहोचू नये या हेतूने करवीर निवासिनी अंबाबाईच्या पुजाऱ्यांनी देवीची मूळ मूर्ती मंदिरातून काढून नेऊन कपीलतीर्थाजवळ गुप्त ठेवली होती.पुढील काळात कोल्हापूर प्रांत स्वराज्यात आला.छत्रपतींचे स्थिरस्थावर राज्य स्थापन झाले,तेव्हा वेदशास्त्रसंपन्न नरहरभट सावगावकर यांनी करवीर राज्याचे अधिपती श्रीमंत छत्रपती संभाजीराजे (दुसरे) यांची पन्हाळगडावर भेट घेऊन महाराजांस हा सर्व वृत्तांत सांगितला व आपणांस साक्षात्कार होऊन आई अंबाबाईने आपली मूर्ती मूळ ठिकाणी स्थापन करावी,असा दृष्टांत दिल्याचे महाराजांस सांगितले.यावेळी छत्रपती संभाजीराजेंनी आपले सेनापती सिदोजी घोरपडे - हिंदूराव गजेंद्रगडकर यांना अंबाबाईच्या मूर्तीची मूळ मंदिरात विधीवत प्रतिष्ठापना करण्याची आज्ञा दिली.महाराजांच्या आज्ञेनुसार सेनापती घोरपडेंनी सन १७१५ साली विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर करवीरनिवासिनीच्या मूर्तीची मूळ मंदिरात विधीवत प्रतिष्ठापना केली.ती तारीख होती दिनांक.२६ सप्टेंबर १७१५.

तोच हा ऐतिहासिक दिवस,जेव्हा एक शतकाहून अधिक काळ गुप्तपणे लपवून ठेवलेल्या अंबाबाईच्या मूर्तीची तिच्या मूळ मंदिरात पुनर्स्थापना झाली.छत्रपतींच्या स्थिर व सुरक्षित राजसत्तेचे ते प्रतीक होते.मूर्तीबद्दलची माहिती देऊन आपल्याकडून हे शुभकार्य घडवून घेतल्याबद्दल छत्रपती संभाजीराजांनी नरहरभट यांना काही पेठा व वतने इनाम दिली व देवीच्या नित्य पूजाअर्चेसाठी सावगाव हे गाव इनाम दिले. 

छत्रपती संभाजीराजे (दुसरे) म्हणजे छत्रपती शिवरायांचे नातू व छत्रपती राजाराम महाराजांचे सुपुत्र होत.

संदर्भ :

करवीर रियासत,पान २६४ सेनापती घोरपडे घराण्याची कैफियत.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top