येत्या निवडणुकांमध्ये मताधिकार बजावण्यासाठी नवमतदारांनी नावनोंदणी करावी.-जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल रेखावार यांचे आवाहन.!

0

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अजित निंबाळकर)

 निवडणुका पारदर्शक आणि न्याय्य वातावरणात पार पाडण्यासाठी मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण,शुद्धीकरण अत्यंत महत्वपूर्ण असते.यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या वतीने २७ ऑक्टोबर २०२३ रोजी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर आणि मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयांमध्ये प्रारुप यादी प्रकाशित करुन यंदाच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला आहे.हा कार्यक्रम २७ ऑक्टोबर ते ०९ डिसेंबर २०२३ या कालावधीत राबवण्यात येत आहे.०१ जानेवारी २०२४ रोजी किंवा त्या आधी १८ वर्षे पूर्ण केलेल्या नागरिकांना या कालावधीत आगाऊ मतदार नोंदणी करता येणार आहे. तसेच २०२४ च्या एप्रिल,जुलै, ऑक्टोबर या महिन्यांच्या १ तारखेला १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या तरुण-तरुणींनाही या कालावधीत आगाऊ मतदार नोंदणी करता येईल.मात्र त्या अर्जावरील प्रक्रिया या तिमाहीत पूर्ण करण्यात येईल.२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये मताधिकार बजावण्यासाठी ही संधी महत्वाची असल्याने पात्र नवमतदारांनी नावनोंदणी करावी,असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.

प्रारुप मतदार यादीमध्ये आपले नाव असल्याची खात्री मतदारांनी करुन घ्यावी.ऐन मतदानाच्या दिवशी आपले नाव मतदार यादीत नाही,अशी तक्रार अनेक मतदारांकडून केली जाते.तसेच आपले नाव,पत्ता,लिंग,जन्मदिनांक,वय, ओळखपत्र क्रमांक,मतदारसंघ इ.तपशील सुद्धा अचूक आहेत का याचीही खात्री करणे आवश्यक आहे.ज्या मतदारांना या तपशिलामध्ये दुरुस्त्या करायच्या असतील त्यांनी अर्ज क्र. आठ भरावा.विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत नवीन अर्हता दिनांकावर आगाऊ मतदार नोंदणी करता येते, त्याप्रमाणे एखाद्याच्या नावासंबंधी हरकत सुद्धा घेता येते. एखाद्या मतदारसंघातील एखादा मतदार हा यादीत दिलेल्या पत्त्यावर राहत नसेल,तर अशा नावाबद्दल त्याच मतदारसंघातील अन्य मतदार आक्षेप घेऊ शकतो.त्यामध्ये जर तथ्य आढळून आले तर पडताळणी करुन संबंधित मतदाराच्या नावाची वगळणी केली जाते.मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण होण्यासाठी अशा अपात्र मतदारांची वगळणीही महत्त्वाची असते.

वंचित घटकातील नागरिकांच्या मतदार नोंदणीसाठी विशेष शिबिरे-  

वंचित घटकातील नागरिकांची मतदार यादीत अल्प प्रमाणात नोंद असल्याने त्यांच्यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.दि.१८ व १९ नोव्हेंबर या कालावधीमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी,महिला व दिव्यांग व्यक्ती यांच्यासाठी विशेष शिबिरे राबवली जाणार आहेत.विद्यार्थ्यांच्या मतदार नोंदणीसाठी महाविद्यालयांमधील राष्ट्रीय सेवा योजना व निवडणूक साक्षरता मंडळ यांचे सहकार्य घेतले जाणार आहे. महिलांच्या मतदार नोंदणी शिबिरांसाठी महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळ (माविम),महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (एसएसआरएलएम) या शासकीय विभागांचे सहकार्य घेण्यात येणार आहे. तर दिव्यांगांसाठी कार्य करणाऱ्या सामाजिक संस्थांच्या मदतीने दिव्यांग व्यक्तींची मतदार नोंदणी,त्यांची मतदार यादीतील नोंद चिन्हांकित करणे इ.बाबी केल्या जाणार आहेत.तृतीयपंथी व्यक्ती,शरीरव्यवसाय करणाऱ्या स्त्रिया,भटक्या-विमुक्त जमाती यांच्यासाठी २ व ३ डिसेंबर या दिवशी शिबिरे आयोजित केली जाणार आहेत.ही शिबिरे सामाजिक संस्थांच्या सहकार्याने या समाजघटकांच्या सोयीच्या ठिकाणी आयोजित केली जाणार आहेत.या समाजघटकांकडे वास्तव्य आणि जन्मतारखेच्या कागदपत्रांची कमतरता लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने त्यांना स्व-घोषणापत्राची सवलत दिली आहे,त्यामुळे समाजातील या व्यक्ती आता कोणतीही कागदपत्रे नसली तरी मतदार नोंदणी करु शकणार आहेत. 

विशेष ग्रामसभांचे आयोजन-  

ग्राम विकास व पंचायतराज विभागाच्या सहकार्याने १ ते ७ नोव्हेंबर या कालावधीत राज्यभर विशेष ग्रामसभेचे आयोजन केले जाणार आहे.या काळात राज्यभरातील ग्रामसभांमध्ये मतदार यादीचे वाचन केले जाईल.या अंतर्गत नव्याने नावनोंदणीस पात्र नागरिक,लग्न होऊन गावात आलेल्या स्त्रिया,गावात कायमस्वरुपी नव्याने वास्तव्यास आलेले नागरिक यांची नावनोंदणी केली जाईल.तसेच दुबार नावे,मृत व्यक्ती,गावातून कायमस्वरुपी स्थलांतरित झालेल्या व्यक्ती, लग्न होऊन अन्य गावात गेलेल्या स्त्रिया यांच्या नावांची मतदार यादीतून वगळणी केली जाईल.

अंतिम मतदार यादीतील मतदार-  

दि.५ जानेवारी २०२३ च्या अंतिम मतदार यादीमध्ये जिल्हयात एकूण मतदारसंख्या ३१ लाख ५० हजार ४६ इतकी होती.ही मतदार संख्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत ७६.४२ टक्के इतकी होती.त्यानंतर झालेल्या निरंतर अद्ययावतीकरण प्रक्रियेत मतदार नोंदणी,नाव वगळणी या बाबी सुरुच होत्या. आता २७ ऑक्टोबर रोजी प्रकाशित झालेल्या प्रारुप मतदार यादीतील एकूण मतदारसंख्या ३१ लाख ५७ हजार ३८८ एवढी आहे आणि ही संख्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत ७६.११ टक्के  इतकी आहे.३७ हजार ७२० इतकी नवीन मतदार नोंदणी आहे, तर ३० हजार ३७८ मतदारांची नावे वगळली गेली आहेत.वगळण्यात आलेली ही नावे दुबार,मयत,कायमस्वरूपी स्थलांतरित या मतदारांची होती.

जानेवारी २०२३च्या अंतिम मतदार यादीमध्ये पुरुष मतदारसंख्या १६ लाख १२ हजार ९५७  होती. तर २७ ऑक्टोबर रोजी प्रकाशित झालेल्या प्रारूप मतदार यादीतील पुरुष मतदारसंख्या १६ लाख १३ हजार ७१५ आहे.तर स्त्री मतदारांची जानेवारी २०२३ मधील संख्या १५ लाख ३६ हजार ९६६ होती,तर ऑक्टोबर २०२३ मधील संख्या १५ लाख ४३ हजार ५३५ आहे. जानेवारी २०२३ मधील यादीमध्ये एक हजार पुरुषांच्या मागे ९५३ स्त्रिया होत्या,तर ऑक्टोबरच्या यादीत एक हजार पुरुषांच्या मागे ९५७ स्त्रिया आहेत. तृतीयपंथी समुदायाची जानेवारी २०२३ मधील संख्या १२३ होती, ऑक्टोबर २०२३ मध्ये १३८ इतकी आहे.

युवा मतदारांची नोंदणी वाढवण्यासाठी महाविद्यालयांमध्ये विशेष शिबिरांचे आयोजन-  

कोल्हापूरच्या लोकसंख्येत १८-१९ वयोगटाची टक्केवारी ३.७१ (१,५४,००८) इतकी आहे,पण ऑक्टोबरच्या मतदार यादीत या वयोगटाची टक्केवारी फक्त १.०१ (४१,८९५) एवढी आहे.तर २०-२९ या वयोगटाची लोकसंख्येतील टक्केवारी १८.३७ (७,६२,१७१) इतकी आहे,पण ऑक्टोबरच्या मतदार यादीत या वयोगटाची टक्केवारी फक्त १४.०७ (५,५३,७९५) एवढी आहे. भारत हा तरुणांचा देश आहे.तथापि मतदार यादीतली त्यांची आकडेवारी अल्प आहे.त्यामुळे युवा मतदारांची नोंदणी वाढवण्यासाठी महाविद्यालयांमध्ये विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.तसेच 'उत्कृष्ट मतदार-मित्र महाविद्यालय पुरस्कारा' चे आयोजनही करण्यात आले आहे.१०० टक्के मतदार नोंदणी केलेल्या आणि मतदार जागृतीचे उपक्रम राबवणाऱ्या महाविद्यालयांना हे पुरस्कार दिले जाणार आहेत.नागरिकांनी `Voter Helpline App`चा जास्तीत जास्त वापर करुन मतदार नोंदणी व दुरुस्ती करावी,असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.

 १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीचा संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित.-

१ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीचा संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे.मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचे वेळापत्रक -- दावे व हरकती सादर करण्यासाठी- 27 ऑक्टोबर ते 9 डिसेंबर 2023.तसेच विशेष शिबीर अंतर्गत महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांसाठी- मंगळवार 7 नोव्हेंबर 2023.  महिला व दिव्यांग व्यक्तींसाठी - शनिवार 18 नोव्हेंबर व रविवार 19 नोव्हेंबर 2023.तृतीयपंथी,शरीरविक्रय करणाऱ्या स्त्रियांसाठी - शनिवार 2 डिसेंबर व रविवार 3 डिसेंबर 2023.तर सर्वसामान्य मतदार नोंदणीसाठी शनिवार 4 नोव्हेंबर व रविवार 5 नोव्हेंबर 2023 रोजी विशेष शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे.दावे व हरकती निकाली काढण्यासाठी मंगळवार 26 डिसेंबर 2023 पर्यंतची तारीख आहे.तर अंतिम मतदार यादी सोमवार 5 जानेवारी 2024 रोजी प्रसिद्ध केली जाईल.

२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये मताधिकार बजावण्यासाठी मतदार यादीत नाव नोंदणी करणे महत्वाचे असल्याने पात्र नवमतदारांनी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमात नावनोंदणी करावी,असे आवाहन जिल्हाधिकारी रेखावार यांनी केले आहे.

Tags

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top