श्री क्षेत्र कारंजा महात्म्य.- परमगुरु श्री.नृसिंहसरस्वती स्वामी महाराज दत्तात्रेय जन्मस्थान(घुडे वाडा).

0

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अनिल जोशी)

श्री नृसिंहसरस्वती स्वामी महाराजांनी व्रतबंध झाल्यावर बद्रिकेश्वर व उत्तर हिंदूस्थानची यात्रा केली आणि जवळपास ३० वर्षानंतर ते आपल्या सर्व शिष्यांसह कारंज्यास आई-वडिलांच्या भेटीस आले.तो पर्यंत त्यांच्या आईला ४ मुलगे व एक मुलगी झाली होते.कुटुंब समृद्ध स्थितीत होतं.तीन दिवस कारंज्यास थांबून महाराज दक्षिणेकडे गेले आणि ते तिकडेच राहिले ! बासर, भिलवडी, गाणगापूर, नृसिंहवाडी, औदुंबर  इकडेच अनेक चमत्कार करुन त्यांनी लोकांना भक्तिमार्गास लावलं.ते परत कारंज्यास आलेच नाहीत.त्यामुळे पुढे कारंजा हे गाव श्री.नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे जन्मस्थळ आहे,हे विस्मरणात गेलं. 

श्री बाळकृष्ण श्रीधर घुडे यांनी नगरनाईक काळे यांचा वाडा सन १८८० च्या सुमारास विकत घेतला व अशा प्रकारे तो घुडे वाडा झाला. काळे यांचे वंशज काशीस स्थलांतरित झाले व त्यांच्यापैकी कोणालाच श्रीगुरूंच्या जन्मस्थानाची कल्पना नव्हती. 

पण इ.स. १९०५ साली नरसी नामदेव येथील चातुर्मास आटोपून प.पू.श्री.वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज वाशिमला आले. तेथे काही कुटुंबीयांना अनुग्रह देऊन अमरावतीस जाताना ते कारंज्यास आले. कारंजाला बिंदुतिर्थाच्या काठावर एक समर्थ शिष्य रोकडाराम महाराजांनी स्थापन केलेला काळा मारोती आहे, त्या मंदिरात ते थांबले. प्रातःकाळी स्नानासाठी बिंदु तिर्थावर आले. तेथे कारंजाचे पोलिस पाटिल श्री. बाळाभाऊ महाजन यांचाही प्रातःस्नानाचा नियम होता तेही तेथे आले होते. कोणी संन्यासी आहेत असे पाहून श्री. महाजनांनी त्यांना नमस्कार केला. त्यावेळी स्वामींनी त्यांना आमच्या महाराजांचे हे जन्मस्थान आहे, ते कुठे आहे ते आम्हास दाखवा असं विचारलं.परंतु श्री. महाजन यांना काहीच कल्पना नव्हती.

परंतु थोडा विचार केल्यावर महाजन थोरल्या महाराजांना म्हणाले की स्वामी इथे एक हवेली आहे. ती एका घुडे नामक सावकाराने श्री. काळे ह्यांचे कडून विकत घेतली होती, पण ते त्या हवेलीत राहू शकले नाहीत. तिथे त्यांना आरतीचे आवाज येत असत कधी वेदमंत्र ऐकायला यायचे म्हणून त्या घुडे सावकारांनी समोरची मोकळी जागा घेऊन तिथे निवासस्थान बांधलं व श्री.काळे ह्यांचे कडून घेतलेली हवेली अडगळीची हवेली म्हणून दुर्लक्षीत पडली.असं सांगून श्री. महाजन प. पू. थोरल्या स्वामींना त्या हवेलीत घेऊन गेले व ती दाखविली. त्याक्षणी तिथेच प. पू. थोरल्या स्वामींची भावसमाधी लागली ! थोड्या वेळाने भानावर आल्यावर हेच आमच्या महाराजांचे जन्मस्थळ आहे,असे त्यांनी सांगितले आणि ते पुढे मार्गस्थ झाले! 

अशा प्रकारे विस्मृतीत गेलेले श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे जन्मस्थान श्री थोरल्या स्वामी महाराजांनी शोधून ते जगासमोर आणलं. त्याच घुडे वाड्यातील श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे जन्मस्थान,ती खोली पाहण्याचे भाग्य मला लाभलं. घुडे वाड्याच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर उजवीकडे एक लोखंडी जिना वर जातो. तिथेच श्री गुरूंचे जन्मस्थान आहे. त्या खोलीतील जमीन शेणाने सारवलेली आहे.मध्यभागी एका खांबाला टेकून श्री महाराजांची तसबीर आणि पादुका आहेत.त्या खोलीतून पुढे गेलं की एक व्हरांडा लागतो.तिथेच नृसिंहाची भिंत आहे.या भिंतीवरच एका बाल संन्याशाची छाया दिसायची आणि याच भिंतीमुळे या स्थानाचा शोध लागला.त्या भिंतीतच सध्या पादुका बसवण्यात आल्या आहेत. या वाड्यात श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचं बालपण गेलं,ते इथेच खेळले बागडले म्हटल्यावर या स्थानी किती जबरदस्त स्पंदनं आणि ऊर्जा असणार हे मी वेगळं सांगणे न लागे.प्रत्येक श्रीदत्त भक्ताने आयुष्यात एकदा तरी भेट द्यावी असं हे ठिकाण आहे.

ता.क. - घुडेवाडा दर्शनाची वेळ सकाळी ९ ते संध्याकाळी ५ आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top