राज्यात किमान ५ मोठ्या शासकीय रुग्णालयात लिव्हर व किडनी प्रत्यारोपणाची सुविधा सुरू करणार - वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री,हसन मुश्रीफ.

0

 -अत्याळ प्राथमिक आरोग्य केंद्रासह बीपीएचयू इमारतीचे भूमिपूजन.

-गडहिंग्लज शहरासह तालुक्यातील विविध विकास कामांचा पालकमंत्री मुश्रीफ यांच्याकडून आढावा.

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अजित निंबाळकर)

शासकीय रुग्णालयात मोठ मोठ्या शस्त्रक्रियेची सुविधा व प्रत्यारोपण व्यवस्था नाही.गोरगरिबांसाठी राज्यातील २७ पैकी महत्वाच्या ५ ठिकाणच्या जिल्हा रुग्णालयात येत्या तीन ते चार महिन्यात लिव्हर व किडनी प्रत्यारोपण सुविधा सुरू करणार असल्याचे राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी अत्याळ,कोल्हापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भूमिपूजनप्रसंगी सांगितले.नांदेड सारख्या दुर्दैवी घटना राज्यात पुन्हा पुन्हा होऊ नयेत म्हणून आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासह त्या सुसज्ज करण्याचे कार्य शासनाने हाती घेतले आहे.शासकीय रुग्णालयांवर नेहमीच क्षमतेपेक्षा जास्त ताण असतो.त्यासाठी जिल्हा रुग्णालयाबरोबरच जर ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालय अधिक बळकट केली तर मुख्यालयात असलेल्या जिल्हा रुग्णालयावरील ताण कमी होईल.यातून गरजूंना चांगल्या प्रकारची आरोग्य सेवा मिळेल,असे प्रतिपादन त्यांनी केले.यावेळी उपसंचालक आरोग्य सेवा प्रेमचंद कांबळे,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुप्रिया देशमुख,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राजेश गायकवाड,तहसीलदार ऋषिकेश शेळके,गटविकास अधिकारी शरद मगर,माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश पाटील व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अत्याळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्र निर्माण होत असल्यामुळे नजीकच्या बेळगुंदी,इंचनाळ,कौलगे,हीरलगे, ऐनापुर,करंबळी व गिजवणे गावातील अंदाजे २६ ते २७ हजार नागरिकांना आरोग्याच्या सोयी सुविधा जवळच मिळणार आहेत.यापूर्वी पालकमंत्री मुश्रीफ यांनी उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लज येथील बीपीएचयु या नवीन इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन केले.पंधराव्या वित्त आयोगांमधून गडहिंग्लज तालुक्याच्या ठिकाणी बीपीएचयू नवीन इमारत बांधकाम मंजूर आहे.या ठिकाणी इमारतीमध्ये होणाऱ्या अत्याधुनिक प्रयोगशाळेतील सुविधांचा लाभ आता तालुक्यातील मोठ्या संख्येने असलेल्या लोकसंख्येला होणार आहे.विविध चाचण्यांसाठी आता नागरिकांना जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागणार नाही.४० लक्ष रुपये तांत्रिक मान्यता असलेल्या या इमारतीमध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळेबरोबरच तालुका आरोग्य अधिकारी यांचे प्रशस्त कार्यालय असणार आहे. या इमारतीचे भूमिपूजन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते संपन्न झाले.

तत्पूर्वी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी गडहिंग्लज नगर परिषदेमध्ये विविध विकास कामांचा आढावा घेतला.त्यांनी विकास व सौंदर्यीकरण यावर भर देण्याच्या सूचना केल्या व त्या अनुषंगाने आवश्यक निधी देण्याचे आश्वासन दिले.यावेळी नगर परिषदांना दिलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदानातून करावयाच्या कामांच्या सद्यस्थितीबाबत त्यांनी माहिती जाणून घेतली.मुश्रीफ यांनी मुख्याधिकारी व उपस्थित अधिकाऱ्यांना मंजूर कामांच्या निविदा प्रक्रिया तातडीने राबवण्याच्या सूचनाही दिल्या.या बैठकीला मुख्याधिकारी स्वरूप खारगे यांनी विविध कामांची माहिती सादर केली.प्रांत बाळासो वाघमोडे,तहसीलदार ऋषिकेश शेळके यांचेसह नगरपरिषदेचे माजी पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top