युवकांनो राष्ट्रीय कामाला प्राधान्यक्रम द्या.-- सचिन अडसूळ,जिल्हा माहिती अधिकारी,कोल्हापूर

0

 जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

 युवकांचा देश म्हणून ओळख असलेल्या भारत देशात युवकांनी सर्वच क्षेत्रात भरारी घेतलेली आहे. युवा लोकसंख्येला लोकशाहीने अनेक सुविधा,अधिकार,हक्क दिले आहेत.देशात प्रत्येकाच्या हाताला काम मिळण्यासाठी विकासाला अधिक चालना देण्याची गरज आहे.लोकशाही सुदृढ व सक्षम असेल तर विकासाला चालना देता येते. आपल्या देशाने लोकशाही स्वीकारली आणि आपण ही लोकशाही पद्धती अजूनही टिकवून ठेवली आहे. लोकशाहीने दिलेल्या सुविधा,अधिकार,हक्क आपल्याला वाढविण्यासाठी, त्यात आवश्यक बदल करण्यासाठी,तुमच्या विचारधारेचे राज्यकर्ते निर्माण होणे गरजेचे आहे.मतदान प्रक्रिया ही मुळातच चांगले राज्यकर्ते निर्माण करणारी पवित्र प्रक्रिया आहे,आणि मतदान करणेसुद्धा देश सेवेचाच एक भाग आहे. मतदान करताना चिन्हाच्या मागील असलेल्या उमेदवाराला आपण मतदान करतो.चिन्हापेक्षा आपला चांगला उमेदवार निवडून आला पाहिजे ही मानसिकता आपण ठेवून मतदानाचा हक्क बजावला पाहिजे.मतदान केले नाही म्हणून ते निवडून येत नाहीत असे नाही.उलट चुकीचा नेता निवडला जाण्याची शक्यता वाढते.प्रक्रियेच्या बाहेर राहून टीका करण्यापेक्षा, मतदान करून प्रत्यक्ष सहभाग नोंदवावा.जर तुम्ही मतदानच केलं नाही तर तुम्हाला प्रश्न विचारण्याचाही अधिकार उरत नाही ही बाब आपण लक्षात घ्यायला हवी.राष्ट्रप्रेम,राष्ट्रवाद आणि राष्ट्रीय योगदानात आपण कुठे आहोत याचा विचार करताना मतदान करणे हे सुद्धा राष्ट्रीय काम आहे याचा विचार व्हावा.

मागील वेळी 2019 च्या झालेल्या लोकसभा निवडणूकीत देशात एकुण मतदार नोंदणी झालेल्या मतदारांपैकी फक्त 67 टक्के लोकांनी मतदान केले.  देशातील 91 कोटी मतदारांमधील 30 कोटींहून अधिक जणांनी मतदानाला प्रत्यक्ष पाठ फिरवीली. महाराष्ट्रात 8.85 कोटी मतदारांपैकी 61 टक्के मतदारांनी मतदान केले. कोल्हापूरमधील दोन्ही लोकसभा मतदार संघात मिळून 36.57 लाख मतदार होते. त्यातील 70.73 टक्के मतदारांनी मतदान केले. ही आकडेवारी देशाच्या व राज्याच्या तुलनेत जास्त असली तरी ती पुरेशी नाही. यावेळी फक्त कोल्हापूर जिल्हयातील 10 विधानसभा मतदार संघातील मतदारांचा विचार केल्यास दि.20 डिसेंबर 2023 च्या आकडेवारी नुसार पुरूष मतदार  16.12 लाख, महिला 15.48 लाख व तृतीयपंथी मतदार 158 असे मिळून 31.60 लाख मतदार मतदार यादीत समाविष्ट आहेत. यातील जवळपास 6 लाख 18 ते 29 या वयोगटातील तरूण मतदार आहेत.

समृद्ध,बळकट आणि पारदर्शक लोकशाही प्रक्रियेसाठी तरुणांनी मतदान प्रक्रियेत प्रत्यक्ष सहभाग नोंदविणे आवश्यक आहे.देशाच्या भविष्याचा विचार करणारा,विकासाची दिशा ठरविणारा घटक म्हणून युवकांकडे पाहिले जाते.मग हेच युवक राष्ट्रीय कामाला प्राधान्य देत नसतील तर,जे तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिलेले विकसित भारताचे स्वप्न कधी पुर्ण करणार? भारताची लोकशाही व्यवस्था ही जगातील मोठी लोकशाही आहे.ही लोकशाही टिकविण्याची व अधिक सुदृढ करण्याची जबाबदारी ही आजच्या तरुण पिढीवर आहे.पारदर्शक निवडणुका हा या लोकशाहीचा गाभा आहे.देशाच्या विकासात आजच्या युवकांच्या आपेक्षा,गरजा,त्यांच्या सक्षमतेला अपेक्षित व्यासपीठ,रोजगार संधी यांना जर योग्य स्थान द्यायचे असेल तर युवा मतदार जागृत असणे आवश्यक आहे. कोणत्याही क्षेत्रात काळासोबत पाऊल टाकत परिवर्तन घडवायचे असेल तर युवकांचा सहभाग निर्णायक ठरतो.येणाऱ्या सर्वच निवडणुकांमधे तरुणाईने मोठ्या संख्येने मतदान करणे आवश्यक आहे.नोंदणी प्रक्रियेतून आता युवा मतदारांचा टक्का वाढत आहे.आजची युवा पिढी ही भविष्याचा वेध घेत अभ्यास करते.त्यांना हव्या असलेल्या करिअरच्या वाटा,कौशल्ये याबाबत युवापिढीची मतंही ठरलेली आहेत.मतदानात जर युवकांचा सहभाग वाढला तर त्यांना लोकशाहीची खरी ओळख होईल.युवक म्हणून ज्या सामाजिक जबाबदाऱ्या व कर्तव्ये आहेत त्यांची जाण व भानही येईल. म्हणून मतदान या राष्ट्रीय कामाला युवकांसह सर्व वयोगटातील मतदारांनी प्राधान्य देणे आवश्यक वाटते.


Tags

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top