आपल्या शरीरात वारंवार निर्माण होणाऱ्या "आम्लपित्ताच्या" त्रासासंबंधी अतिशय उत्कृष्ट उपयुक्त माहिती.!-

0

 आरोग्य भाग- 18

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अनिल जोशी)

आपल्या भारत देशामध्ये एका वर्षात तीन ऋतू असतात उन्हाळा,पावसाळा आणि हिवाळा.तथापि आज-काल पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे फक्त उन्हाळाच जास्त जाणवत असतो.या उन्हाळ्यामुळे बहुतांश जणांमध्ये पित्ताचा प्रकोप होऊन आम्लपित्ताचा त्रास होत असतो.उन्हाळ्यामध्ये पचनक्रिया मंद होते;त्यामुळे आपण खालेल्ल्या अन्नाचे नीट पचन होत नाही त्यालाच मंदाग्नी किंवा अग्निमांद्य असे म्हणतात.आम्लपित्त हा मंदाग्नीचाच प्रकार आहे.

लक्षणे :-

 जेवण केलेल्या अन्नाचे पचन न होणे,भोजनानंतर दोन तासांनी आंबट उलटी होणे,छाती व घशामध्ये दाह जळजळ होणे,पोटामध्ये दुखणे,मलावरोध,तोंड बेचव होणे ही लक्षणे असतात.ही लक्षणे फार दिवस राहिली तर पुढे आमाशय तसेच आतड्यामध्ये व्रण म्हणजे अल्सर होतो.आम्ल पित्ताचा त्रास असेल तर पित्त वाढून तोंडात येते.त्यामुळे तोंड आंबट होणे तसेच दाताना थंड अथवा गरम पाणी लागू न देणे असा त्रास होतो त्यासाठी बऱ्याचदा दातांच्या डॉक्टरकडून चिकित्सा केली जाते परंतु त्याचा तात्पुरताच उपयोग होतो.अशा रुग्णांवर आम्लपित्ताची चिकित्सा केल्यास त्यांना त्यांचा चांगला फायदा होऊ शकतो.हल्ली बहुतेक तरुणांना आम्लपित्ताचा त्रास असतोच. 

 कारणे:- 

आम्लपित्ताचे प्रमुख कारण म्हणजे आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे ऋतूचर्या,दिनचर्या व रात्रीचर्या न पाळणे.तसेच औद्योगिक करणामुळे सध्या दिवस रात्र काम करणे,हॉटेलचे अन्न सेवन करणे,फास्ट फूड,चायनीज फूड, जंक फूड यांचा अतिरेक.भारतीय हवामानानुसार शरीरासाठी हितकारक असलेले अन्नसेवन न करता पाश्चात्यांचे अंधानूकरण करीत फक्त जिभेला जे चांगले लागते तेवढ्याचेच अति सेवन करणे.फसफसणारी पेये सातत्याने सेवन करणे, अतिरिक्त पैसा असल्यामुळे येणारी सुखासीनता,अतिरिक्त मानसिक ताणतणाव या सर्वांचे घातक परिणाम म्हणजे आम्लपित्ताची सुरुवात.त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे किंवा वर्षानुवर्ष त्यावर उपायोजना न केल्यामुळे पुढे अल्सरचा धोका उद्भवतो .

 चिकित्सा :- 

आधुनिक चिकित्सा शास्त्रानुसार पित्त फक्त दाबून ठेवले जाते. त्यामुळे गोळ्यांचा परिणाम संपताच ते पुन्हा उफाळून येते.त्यामुळे  ही औषधे घेतल्याने आम्लपित्त कधीच कमी होत नाही.तसेच अँन्टीबाँयोटिक्स व वेदनाशामक गोळ्या घेतल्याने आम्लपित्त वाढते.त्यामुळे आम्लपित्तासाठी अँलोपँथी औषधे न घेता आयुर्वेदिक औषधे घेतल्यास चांगला फायदा होतो. 

 आयुर्वेदिक चिकित्सा:- 

आयुर्वेदामध्ये चिकित्सा करण्यापूर्वी निदान परिमार्जन सांगितले जाते.त्यामुळे आपल्या चुकीच्या सवयी की ज्यामुळे पित्ताचा प्रकोप होऊ शकतो त्यात बदल करण्यास सांगितले जाते.त्यामुळे आम्ल पित्ताचे मूळ कारण नाहीसे होते त्यानंतर अन्नाचे पचन करणारी चिकित्सा दिली जाते.त्यानंतर विरेचन देऊन म्हणजे वाढलेले पित्त जुलाबा वाटे शरीराच्या बाहेर काढून टाकून पित्तशामक चिकित्सा केली जाते.त्यामुळे रुग्णावर दीर्घकाळ आयुर्वेदिक चिकित्सा केल्यानंतर अग्निमान्द्य म्हणजेच मंदाग्नी तसेच आम्लपित्त दोन्हीही कमी होते.सर्वप्रथम निदान परिमार्जन म्हणजे आम्लपित्त होण्याची जी कारणे वर सांगितली आहेत त्यांचा त्याग करावा तेलकट, मसालेदार,चटपटीत असे अन्न खाऊ नये.तीक्ष्ण,उष्ण,तिखट, आंबट हे पदार्थ वर्ज्य करावेत.आंबविलेले पदार्थ जसे की डोसा इडली वगैरे जास्त प्रमाणामध्ये खाऊ नयेत.तळलेले पदार्थ दही,पापड,लोणची,शेंगा चटणी,तीळ असे पदार्थ आम्ल पित्त असणाऱ्या व्यक्तीने खाऊ नयेत.अति चहा कॉफी पिऊ नये तसेच सर्व व्यसनांचा त्याग करावा तंबाखू,गुटखा,सिगारेट, दारू हे पित्त वाढविणारे पदार्थ आहेत त्यामुळे ते टाळावेत जागरण चिंता मानसिक तणाव यापासून दूर राहावे नियमित व वेळेवर जेवण करावे.उपाशी राहू नये दिवसातून तीन चार वेळा थोडा थोडा आहार घ्यावा.अग्निमांद्य असेल तर प्रथम मंदाग्नीची चिकित्सा करावी त्याकरिता हिंग्वाष्टक चूर्ण,पाचक वटी,संजीवनी वटी अशी औषधे वैद्यांच्या सल्ल्याने घ्यावीत. छातीत जळजळ,उलटीची भावना,पोटात दाह असेल तर कामदुधा,मौक्तिक भस्म,सूतशेखर,लघुसूतशेखर,गोदंती भस्म, प्रवाळ भस्म अशी औषधे योग्य मात्रेत वैद्यांकडून घ्यावी. पित्ताची चिकित्सा करण्यापूर्वी विरेचना द्वारे संचित पित्त बाहेर काढणे आवश्यक असते.आम्लपित्ताच्या रुग्णांनी रोज झोपताना एक चमचा त्रिफळा चूर्ण कोमट पाण्यातून घेतोय फायदा होतो.आम्ल पित्तापासून मुक्ती मिळण्यासाठी आयुर्वेदात सांगितलेले ऋतुचर्या,दिनचर्या,आहार विहार यांचा अवलंब करणे आवश्यक आहे.आम्लपित्तामध्ये थंड दुधाचे सेवन हितकारक असते तसेच शहाळ्याचे पाणी,आहारात मुगाची खिचडी,ज्वारीची भाकरी,हिरव्या पालेभाज्या असाव्यात.रात्रीचे जेवण झोपण्यापूर्वी किमान चार तास आधी घ्यावेत तसेच जेवणानंतर शतपावली करणे फायदेशीर ठरते. शतपावली करताना इंग्रजी 8 या आकारात फिरणे फायदेशीर ठरते.अन्नपदार्थाचे पचन होणे हे सर्व आजारावरील उत्तम उपाय आहे स्वयंपाकामध्ये धने,जिरे,हिंग,बडीशेप,आले,सुंठ, कोथिंबीर अशा पाचक पदार्थांचा वापर करावा डाळिंबाचा रस हा आम्लपित्तावर चांगला फायदेशीर असतो.जेवण व्यवस्थित चावून चावून घ्यावे.गडबडीत घेऊ नये मन प्रसन्न ठेवावे. चिडचिड राग सोडून ध्यान,धारणा,प्राणायाम,योगासने केल्यास ते हितकारक ठरते.

आम्लपित्तासाठी आयुर्वेदिक कँप्सूल्स,गोळ्या,सिरप देखील उपलब्ध आहेत ते दीर्घकाळ घेतल्याने आम्लपित्त कायमस्वरूपी बंद होऊ शकते.आम्लपित्ताचा त्रास असलेल्या व्यक्ती ने महिन्यातून दोन वेळा पोट साफ होण्यासाठी एरंडभ्रष्ट हरडे टँब्लेट,राज चूर्ण किंवा फ्रिलँक्स ग्रँन्यूल्स रात्री झोपण्यापूर्वी घेतल्याने पोट साफ होते व आम्लपित्ताचा त्रास आटोक्यात राहतो.कारण आम्लपित्ताचे महत्त्वाचे कारण म्हणजे पोट साफ नसणे हेच असते.

वरील आम्लपित्ताच्या माहितीचा लेख डॉक्टर सुरेश खमितकर (आयुर्वेदाचार्य) यांनी केला असून,आरोग्य आणि समर्थ सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून संपादन करून,जनहितार्थ प्रसिद्ध करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top