सांगली- नाट्याचार्य गोविंद बल्लाळ देवल यांच्या जन्मदिनी पवित्र अभिवादन व त्यांच्या जीवनावर आधारित संक्षिप्त वृत्तांत--*

0

 *सांगली- नाट्याचार्य गोविंद बल्लाळ देवल यांच्या जन्मदिनी पवित्र अभिवादन व त्यांच्या जीवनावर आधारित संक्षिप्त वृत्तांत--*  *जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क* 

( *अनिल जोशी* )


 *नाट्याचार्य गोविंद बल्लाळ देवल यांचा जन्म 13/११/१८५५ साली सांगलीतील हरिपूर येथे झाला.* 

*सांगलीच्या कृष्णाकाठाने* तमाम मराठी लोकांना एकाहून एक अशी रत्ने दिली आहेत.मनोरंजनाची अत्यंत कमी साधने उपलब्ध असणारा तो काळ, तेंव्हा देवलांनी संगीत नाटके लिहिली.व लोकांचे मनोरंजन केले.त्यांनी किर्लोस्कर नाटक मंडळी मध्ये दिग्दर्शन देखील केले .लिखाण करत असताना सामाजिक विषयांना त्यांनी हात घातला..मराठी नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांनी जरठ कुमारी विवाहावर आधारीत *संगीत शारदा* नाटक हरिपूरच्या कृष्णा वारणा संगमाच्या समोरील पारावर बसून लिहिले होते.

महाराष्ट्रात संगीत नाटकांचे जनक अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्यानंतर नाटककार म्हणून नाव घेतलं जातं ते देवल मास्तरांचंच. ते ज्या हायस्कुलात शिकत होते तिथे अण्णासाहेब त्यांचे शिक्षक होते. त्यांचा तिथून गुरू-शिष्य संबंध सुरू झाला आणि किर्लोस्कर  नाटक मंडळी स्थापन झाल्यावर तो अधिकच घट्ट  झाला. अण्णासाहेब किर्लोस्कर यांची  ‘शकुंतला’ सुरुवातीला गद्य होती. भाऊराव कोल्हटकरांचं नाटक कंपनीत आगमन झालं आणि ‘शकुंतला’ गाऊ लागली. त्यासाठी अण्णासाहेबांनी स्वत: पदं न लिहिता मोठय़ा विश्वासानं ती आपल्या शिष्याला करायला सांगितली. आणि देवलांनी आपल्या गुरूचा विश्वास सार्थ ठरवला.

देवलांनी एकंदर सात नाटकं लिहिली. ‘दुर्गा’, ‘मृच्छकटिक’, ‘विक्रमोर्वशीय’, ‘शापसंभ्रम’, ‘झुंझारराव’, ‘फाल्गुनराव अर्थात तसबिरीचा घोटाळा’ आणि ‘शारदा’

देवलांनी इंग्रजीवरून तीन, संस्कृतवरून तीन व एक स्वतंत्र अशी एकूण सात नाटके रचली. टॉमस सदर्नकृत द फेट्ल मॅरेजवरुन गॅरिकने तयार केलेल्या इझाबेला  या रंगावृत्तीच्या आधारे दुर्गा (१८८६), शेक्सपिअरकृत ऑथेल्लोची रंगावृत्ती झुंझारराव (१८९०) व मर्फी आणि मोल्येर यांच्या अनुक्रमे ऑल इन द राँग  आणि गॉनारेल  या नाटकांवरुन फाल्गुनराव अथवा तसबिरीचा घोटाळा (१८९३) ही त्यांची परकीय नाट्यकृतींची रूपांतरे होत. पुढे फाल्गुनराव…चे गंधर्व नाटक मंडळीसाठी केलेले संगीत रूपांतर संशयकल्लोळ (१९१६) हे कमालीचे लोकप्रिय ठरले. मृच्छकटिक (१८८९), विक्रमोर्वशीय (१८८९) व बाणाच्या कादंबरीवर आधारलेले शापसंभ्रम (दुसरी आवृ. १९००) ही त्यांची संस्कृताधारे रचलेली नाटके होती.त्यांच्या मृच्छकटिक, झुंझारराव आणि संशयकल्लोळ  यांना प्रायोगिक यश विशेष लाभले.

यांहीपेक्षा त्यांचे सं. शारदा (१८९९) हे नाटक साहित्यिक आणि प्रायोगिक या दोन्ही दृष्टींनी अद्वितीय ठरले.पूर्वीच्या काळी  नाटकाचा पहिला प्रयोग सांगलीमध्ये करून विष्णुदास भाव्यांना अभिवादन केले जायचे आणि नंतर त्या नाटकाचे इतरत्र प्रयोग होत असत. संगीत शारदा नाटकाचा विषय तत्कालीन सांगली संस्थानातील विशिष्ठ घटनेवर आधारीत असल्याने या नाटकाला सांगली संस्थानात बंदी घालण्यात आली होती,त्याला पर्याय म्हणून याचा पहिला प्रयोग इंदोर येथे करण्यात आला.

१८९१ साली लग्नासाठी संमती वयाचा कायदा लागू झाला त्या नंतर १८९९ साली शारदा  नाटक रंगमंचावर आले त्यातल्या जरठ बाला  विवाहाच्या प्रमुख सूत्रामुळे ते प्रचंड गाजले आणि त्या मुळेच १८९१ साली केलेला कायदापुढील काळात *शारदा कायदा* नावाने ओळखला जाऊ लागला

या नाटकाला १०० वर्षे झाली त्या वेळी हरिपूरच्या ज्या झाडाच्या पारावर बसून त्यांनी हे नाटक लिहिले तिथेच सांगलीच्या हौशी कलाकारांनी या नाटकाचा प्रयोग सादर करून त्यांना मानवंदना दिली होती. यातील गाणी विशेष गाजली होती.या प्रयोगासाठी खाशा  निमंत्रितांमध्ये पंडित प्रसाद सावकार, भालचंद्र पेंढारकर, ज.शं.वातणे (दिल्ली), देवल मास्तरांचे नातू बाळासाहेब देवल, तत्कालीन जिल्हाधिकारी नितीन करीर , मा. शिवाजीराव नाईक हजर होते.

देवल मास्तरांनी ज्या पारावर नाटके लिहिली तो झाडाचा पार २०१९ आणि २०२१ च्या महापुरात खिळखिळा झाला.त्याच्या दुरुस्तीच्या घोषणा देखील झाल्या मात्र तो ऐतिहासिक पार आजही दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top